29 ऑगस्ट हा दिवस हॉकीचा जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस. राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करतो. यंदा वर्षीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराऐवजी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे नामकरण घोषित केले आहे. मेजर ध्यानचंद यांच्या खेळातील आठवणींना उजाळा देण्यासाठी हा लेख.
हॉकीचा जादूगार म्हणून ओळखले जाणारे आणि जागतिक स्तरावर हॉकी खेळचे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरणारेे असे महान खेळाडू म्हणजेच मेजर ध्यानचंद!
मेजर ध्यानचंद जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी उत्तर प्रदेशातील इलाहाबाद या शहरात झाला. त्यांचे नाव ध्यानचंद सिंह असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव सर्वेश्वर सिंह. वडील हे ब्रिटीश इंडियन आर्मीमध्ये सुभेदार म्हणून नोकरी करत होते. ध्यानचंद यांना मूलसिंह आणि रूपसिंह असे दोन भाऊ होते तेही हॉकीचे खेळाडू होते. वडील नोकरीनिमित्त झाशी येथे कार्यरत होते. ध्यानचंद यांना लहानपणापासूनच हॉकी खेळाविषयी आवड होती. परंतु वडीलांची सातत्याने होणार्या बदलीमुळे ध्यानचंद यांना आठवी इयत्तेनंतर शाळा सोडावी लागली.
लहानपणी ते ध्यानसिंह या नावाने परिचित होते. आपल्या मित्रांसोबत झाडांच्या फांद्यापासून हॉकी स्टीक आणि कपड्याचा चेंडू बनवून ते हॉकी खेळाचा सराव करत असत. एकदा ध्यानचंद त्यांच्या वडिलांसोबत हॉकी खेळ पाहण्यासाठी गेले होते. त्यांना हरणारा संघ पाहून खूपच दु:ख झाले आणि आपल्या वडिलांना जोरात ओरडून सांगू लागले की, जर मी हरणार्या संघाकडून खेळलो तर त्याचे परिणाम वेगळे दिसू शकेल असते. त्यांचे हे वाक्य त्या मैदानावरील एका अधिकार्याच्या कानावर पडले आणि त्याक्षणी त्यांनी ध्यानचंदना हरणार्या संघाकडून खेळण्याची संधी दिली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ध्यानचंद यांनी सलग 4 गोल करून लोकांना आश्चर्यचकित केले. त्यावेळी त्यांचे वय अवघे 14 वर्षाचे होते. ही कामगिरी पाहून त्यांना वयाच्या 16 व्या वर्षी सैन्यामध्ये भरती होण्याची संधी मिळाली. त्यानंतर मात्र ते हॉकीपासून वेगळे राहू शकले नाहीत.
ध्यानंच यांना पहिले कोच म्हणून भोले तिवारी यांचे मार्गदर्शन मिळाले परंतु त्यांना सैन्यातील नोकरीमुळे हॉकी खेळाकडे पुरेसे लक्ष देता आले नाही. ध्यानचंद यांना हॉकीची मनापासून आवड असल्याने त्यांनी हार न मानता आपला सराव सुरु ठेवला. कधी कधी रात्री चांदण्याच्या प्रकाशात सुध्दा ते हॉकीचा सराव करत असत. ध्यानचंद यांनी सैन्यातील नोकरीबरोबरच हॉकीमध्ये करिअर बनवले. अवघ्या 21 व्या वर्षीै त्यांना न्यूझीलंडमध्ये झालेल्या स्पर्धेसाठी भारतीय संघात त्यांची निवड झाली. त्या स्पर्धेमध्ये त्यांनी भारताला 21 पैकी 18 सामन्यात यश मिळवून दिले.
एम्सटरडम ऑलंपिक
ध्यानचंद यांची वयाच्या 23 वर्षी एम्सटरडम ऑलंपिकमध्ये भारतीय संघाकडून नियुक्ती झाली. भारतीय संघाकडून खेळलेल्या चार सामन्यामधून एकूण 23 गोल आणि सुवर्णपदक मिळविण्यात त्यांचा यशचा वाटा होता..
ध्यानचंद यांची देशभक्ती
सक 1936 च्या बर्लिन ऑलंपिकमध्ये ध्यानचंद यांच्यावर भारताच्या हॉकी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आली. या स्पर्धेत एका पाठोपाठ एक हंगेरी, अमेरिका आणि जपान या संघाना शून्य गोलने भारताने पराभूत केले. या स्पर्धेतील उपात्यफेरी सामन्यात भारताने फ्रांसलाही 10 गोलने हरविले. अंतिम सामना जर्मनी संघाबरोबर होता. या सामन्याच्या मध्यांतरापर्यंत भारताकडे केवळ एकच गोल होता. मध्यांतरानतंर ध्यानचंदने आपल्या पायातील बूट काढून बुटशिवाय आपला खेळ सुरु ठेवला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सामन्यात भारताने जर्मनीचा 8-1 गोलने पराभव करून सुवर्णपदकवर भारताचे नाव कोरले. हा सामना जर्मनचे राष्ट्राध्यक्ष हिटलर पाहत होते आणि ज्यावेळी सामना संपला त्यावेळी त्यांनी ध्यानचंद यांना भेटण्याची विनंती केली. त्यांनी ध्यानचंदजींंचे खूप कौतुक केले आणि हिटलरने ध्यानचंद यांना जर्मनीच्या संघाकडून खेळण्यासाठी विनंती केली, परंतु मेजर ध्यानचंद यांनी पूर्णपणे नकार दिला आणि म्हणाले, मी माझ्या देशासाठीच खेळणार.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
1932 मध्ये भारतीय संघाने 37 सामने खेळले आणि 338 गोल केले, त्यामधील 133 गोल एकट्या ध्यानचंद यांनी केले त्यात 11 गोलवर ध्यानचंद यांचे नाव लिहिले होते. आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये 300 गोल करण्याचा विक्रम ध्यानचंद यांच्या नावावर आहे. हॉकीचा जादूगार म्हणून समजले जाणारे ध्यानचंद यांच्या आयुष्यात अनेक संकटे आली परंतु संकटावर मात करून त्यांनी उत्तुंग भरारी घेतली. हॉलंड येथे झालेल्या एका सामन्यात मैदानावर त्यांची हॉकी स्टीक तोडली व त्यात चुंबक तर नाही ना? याची खात्री करून घेतली तसेच जपानमध्ये त्यांच्या हॉकी स्टीकचे प्रयोगशाळेत परिक्षण करण्यात आले.
पद्मभूषण पुस्कार
1948 साली ध्यानचंद यांनी सैन्य दलातून सेवानिवृत्ती घेतली त्यावेळी वय वर्षे होते अवघे 43. त्याच वर्षी त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. कालांतराने 29 ऑगस्ट हा तत्यांचा जन्म दिवस राष्ट्रीय खेल दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. त्यादिवशी राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार, अर्जून पुरस्कार, गुरूद्रोणाचार्य पुरस्कार उत्कृष्ट खेळाडूंना देण्यात येतो. याच वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार ऐवजी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे नामकरण केले. दिल्लीतील एका स्टेडियमलाही मेजर ध्यानचंद स्टेडियम असे नावही आहे.
1972 साली ध्यानचंद राजस्थानातील माऊंट अबू येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. येथील पोलो या मैदानावर खेळाडूंनी हॉकीची जादू दाखविण्याचा आग्रह धरला. समोर 11 खेळाडू चेंडू अडविण्यासाठी थांबलेले असतानाही वयाच्या 67 व्या वर्षीही गोल करून खेळाडूंना त्यांनी आश्चर्याचा धक्काच दिला.
3 डिसेंबर 1979 रोजी त्यांचे निधन झाले. अशा महान खेळाडूला देश मुकला. त्यांच्या जन्मदिवस राष्ट्रीय खेळदिन म्हणून साजरा करताना त्यांची आठवण करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांना विनम्र अभिवादन!
* ज्ञानेश्वर म्याकल
सहमंत्री,
क्रीडा भारती, पश्चिम महाराष्ट्र प्रांत.
9421068131