सोलापूर : सोलापूर शहर परिसरातील सलगरवस्ती आणि फौजदार चावडी परिसरात दहशत पसरवून धोकादायक झालेल्या सराईत गुन्हेगार रमजान गफूर शेखवर एमपीडीए अंतर्गत स्थानबध्द करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.
रमजान गफूर शेख (वय 47, रा. घर नं.5, थोबडेवस्ती, जुना देगांव नाका, सोलापूर) असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. याने त्याच्या आर्थिक फायद्यासाठी सलगरवस्ती आणि फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे करून नागरीकांमध्ये दहशत पसरवली आहे. त्याने थोबडे वस्ती, देगांव नाका, डोणगांव रोड, न्यू लक्ष्मी चाळ, जुना देगांव नाका, दमाणी नगर, रामवाडी, सलगरवाडी, सलगरवस्ती, सेटलमेंट फ्रि कॉलनी आणि वांग परिसरात घातक शस्त्र घेवून फिरून नागरीकांना धमकावणे, दुखापत करणे, शस्त्राने हल्ला करणे, मारहाण करणे, खुनाचा प्रयत्न करणे, विनयभंग करणे, अपहरण करणे, दारूचा अवैध धंदा करणे, अश्लील कृत्य करणे, जबरी चोरी करणे खंडणी मागणे चोरी करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे केले आहेत.
हा नागरिकांमध्ये दहशत पसरवून धोकादायक इसम म्हणून ठरला होता, त्याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. परंतु त्याच्या वर्तणुकीमध्ये सुधारणा होत नव्हती म्हणून त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करून त्याला पुण्यातील येरवाडा कारागृहात सोडण्यात आले.
* दरोड्याच्या तयारीतील ५ गुन्हेगारांच्या टोळीला अटक
सोलापूर : सोलापूर हैदराबाद रस्त्यावर दरोड्याच्या तयारी असलेल्या 5 जणांना सोलापूर तालुका पोलीसांनी हत्यारासह ताब्यात घेवून पुढील अनर्थ टाळला आहे. ही कारवाई शुक्रवारी (27 ऑगस्ट ) पहाटेच्या सुमारास झाली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शिवराज अशोक हंजगी (वय 27),लक्ष्मण जगन्नाथ उपासे (वय 23),राहूल भागण्णा कोळी (वय 23), धनप्पा राम यलशेट्टी (वय 19), खंडेशा बसवेश्वर उपासे (वय 28, सर्व रा. संगदरी, ता. दक्षिण सोलापूर,जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी की, सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने संपूर्ण ग्रामीण हद्दीत चोरी व गुन्हेगारांना प्रतिबंध व्हावा म्हणून रात्रगस्त लावण्यात येते आहे. त्याच अनुषंगाने सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस अंमलदारांना मार्गदर्शनक सूचना देवून गस्तीसाठी नियुक्त केले आहे.
सहाय्यक फौजदार अनिलकुमार चव्हाण हे कोंडी हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना पोलीस ठाण्याकडून माहिती मिळाली की सोलापूर हैदराबाद रस्त्यावर काहीजण संशयास्पद उभे आहेत, त्यांची चौकशी करून खात्री करावी अशा सूचना मिळाल्यानंतर चव्हाण यांनी हायवे पोलीसांना कळवून मदतीसाठी बोलावले. त्यानुसार सोलापूर हैदराबाद रस्त्यावरील धायफुले मिल चौकात 5 ते 6 जण हातात दगड, लोखंडी टॉमी, रॉड असे साहित्य घेवून उभे होते.
पोलीसांना पाहून पळून जात असताना तिघांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी कबुल केले की हायवेवरील वाहनांना अडवून लुटमार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरीत दोघांना पोलीस पथक पाठवून संगदरी येथून अटक करण्यात आली. पोलीसांनी त्यांच्याकडून दरोड्यासाठी आणलेली क्लुजर जीप, लोखंडी रॉड, लोखंडी टॉमी, लाकडी दांडका, जाड दोरी, मिरची पावडर, दगड असा एकूण 4 लाख 240 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
ही कामगिरी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, सोलापूर उपविभाग पोलीस उपाधिक्षक सुर्यकांत पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर, प्रविण सपांगे, सहाय्यक फौजदार अनिलकुमार चव्हाण, शशिकांत शिंदे, विवेक सांजेकर, हवालदार फैय्याज बागवान, पोलीस नाईक रहीम सय्यद, शशिकांत कोळेकर, शंकर मुजगोंड, प्रदीप कदम, महादेव रोडे, महादेव सोलनकर, चालक पोलीस नाईक बसवराज अष्टगी यांनी पार पाडली.