टोकियो : टोकियोमध्ये सुरु असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये भारताची आजची सुरुवात जबरदस्त झाली. आज अनेक पदकांची कमाई भारताला झाली आहे. भारतीय नेमबाज अवनी लेखराने सुवर्णपदकाचा वेध घेतला. यानंतर लगेचच थाळीफेकमध्ये योगेश कथुनियाकडून रौप्य, भालाफेक पटू देवेंद्र झाझरिया रौप्य, सुंदर सिंगकडून कांस्य पदक पटकावण्यात आले.
देवेंद्र झाझरियानं रौप्यपदक तर सुंदर गुजरनं कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं आहे. त्यामुळे आलाफेकमध्ये भारतीय खेळाडूंच्या खात्यात आणखी दोन पदकांची भर पडली आहे. यासोबतच भारतानं आतापर्यंत पॅरालिम्पिकमध्ये 7 पदकांची कमाई केली आहे.
श्रीलंकेच्या मुद्यांसेलेज हेराथने सुवर्णपदकावर नाव कोरलं. त्यानं 67.79 मीटरचा थ्रो केला. तसेच देवेंद्रनं 64.35 मीटर आणि सुंदर सिंहनं 64.01 मीटर लांब भाला फेकला. राजस्थानच्या चुरु जिल्ह्यातील देवेंद्र झाझरियानं यापूर्वी रियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं होतं. देवेंद्रच्या नावावर भारतासाठी दोन वेळा सुवर्णपदक जिंकल्याचा रेकॉर्ड आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताची नेमबाज अवनी लेखरा हिची सुवर्ण कामगिरी पाहायला मिळत आहे. 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत अवनी लेखराला सुवर्ण पदक मिळालं आहे. दरम्यान, अवनी लेखरानं क्वॉलिफिकेश राउंडमध्ये सातवं स्थान पटकावलं होतं. अवनीनं यासोबतच आणखी एक इतिहास रचला आहे. पॅरालिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी अवनी ही पहिली खेळाडू ठरली आहे.
अवनी लेखरानं सुवर्णपदक जिंकल्यानंतर योगेश कठुनियानं थाळीफेकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून दिलं आहे. योगेशनं 44.38 मीटर थाळीफेक करत पदकावर शिक्कामोर्तब केलं. त्याआधी भारताच्या अवनी लेखरानं 1 मीटर्स एअर रायफल्समध्ये सुवर्ण वेध घेत भारताला सुवर्णपदक जिंकून देत आजच्या दिवसाची शानदार सुरुवात करुन दिली होती.
योगेशच्या कामगिरीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, योगेश कथुनिया यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. योगेशनं देशासाठी रौप्य पदक मिळवल्याचा आनंद आहे. त्याचे यश निश्चितच अनुकरण करण्यासारखे आहे आणि ते नवोदितांना प्रेरणादायी ठरेल. योगेशचं खूप अभिनंदन आणि भविष्यातील कामगिरीसाठी शुभेच्छा, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.