सोलापूर : दुचाकीवरुन जाणाऱ्या डॉक्टरास लिफ्ट मागितली, आणि सोडल्यानंतर त्याठिकाणी थांबलेल्या अन्य तिघांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून मोबाईल आणि रोख रक्कम असा ७ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून त्यांच्या गाडीची किल्ली काढून पोबारा केला. ही सिनेस्टाईल घटना रविवारी (ता. २९) रात्रीच्या सुमारास जुना पुणे नाका ते बाळे रस्त्यावर घडली. या प्रकरणात फौजदार चावडीच्या पोलिसांनी चौघा अनोळखी तरुणाविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला.
डॉ. धम्मपाल रेवण माशाळकर (वय ३८ रा. न्यु बुधवार पेठ) हे रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास बाळे येथे आपल्या मित्राला भेटण्यास दुचाकीवरून निघाले होते. तेव्हा जुना पुणे नाक्याजवळ एका तरुणाने त्यांना लिफ्ट मागितली. त्यांनी त्याला सोबत घेऊन बाळे येथे गेले. त्याला सोडल्यानंतर त्याठिकाणी थांबलेल्या त्याच्या अन्य तीन साथीदारांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाइल आणि रोख रक्कम असा ऐवज काढून घेतले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यानंतर त्यांना टमटम मध्ये बसवून घेऊन केगाव येथील इंजिनिअरिंग कॉलेजजवळ नेले. आणि त्या ठिकाणी त्यांना सोडून त्यांच्या दुचाकीची चावी घेऊन पसार झाले. हा प्रकार झाल्यानंतर डॉ.माशाळकर यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. फौजदार देशमाने पुढील तपास करीत आहेत .
* सासऱ्यास कोयत्याने मारहाण जावयाविरुद्ध गुन्हा दाखल
सोलापूर – दारू पिऊन किरकोळ कारणावरून मुलीसोबत भांडण करू नको, असे सांगितल्याच्या कारणावरून जावयाने आपल्या सासर्याला कोयत्याने मारून जखमी केले. ही घटना राजुरी (ता.सांगोला) येथे रविवारी (ता. २९) रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणात सांगोल्याच्या पोलिसांनी अतुल देवाप्पा काटे (वय ३० रा.राजुरी) या जावयाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
विश्वनाथ ज्ञानू ठोकळे (वय ६० रा.कोळसेवाडी) असे जखमीचे नाव आहे. ते रविवारी रात्री आपल्या मुलीच्या घरासमोर बसले होते. त्यावेळी अतुल हा मद्यप्राशन करून पत्नीबरोबर भांडण करीत होता. विश्वनाथ ठोकळे यांनी तुम्ही नशेत आहात किरकोळ कारणावरून भांडण करू नका. उद्या सकाळी बघू असे सांगितले. तेव्हा त्याने कोयत्याने मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली, अशी नोंद पोलिसात झाली. हवालदार कोष्टी पुढील तपास करीत आहेत.