मोहोळ : मोहोळ रेल्वे स्टेशनजवळील स्लीफर फॅक्टरीतील दीड दिवसाच्या गणेशोत्सवातील ‘श्री’ गणेश मूर्तीचे आष्टे बंधाऱ्यावरील सिना नदीच्या पात्रामध्ये विसर्जन करण्यास गेलेला युवक वाहुन गेल्याची घटना काल शनिवार दुपारी तीनच्या सुमारास घडली असून आज रविवारी सायंकाळपर्यंत शोध कार्य सुरु आहे. परंतु आणखी तो मिळून आला नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की मोहोळ स्टेशनजवळ रेल्वे रूळाखालील सिमेंटचे स्लीफर तयार करणारा कारखाना आहे. या कारखान्यातील कामगार गेली अनेक वर्ष गणेशोत्सव साजरा करतात. या ठिकाणी ‘ श्री ‘ गणेशाच्या मूर्तीचे दीड दिवसात विसर्जन केले जाते. त्या अनुषंगाने शनिवारी (ता .11 ) कंपनीचे काही कामगार एका चारचाकी वाहनामध्ये ‘श्री ‘ गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी मोहोळ शहराला पाणी पुरवठा होत असलेल्या सिना नदीवरील आष्टे बंधाऱ्यावर गेले होते.
त्या कामगारापैकी सौरभ सुभाष बेंबलगे (रा. लातुर , वय वर्ष 20 ) , हा पोहण्यास येत असलेला युवक मोठ्या उत्साहाने श्री मुर्ती घेऊन नदीच्या खोल पात्रात उतरला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अलीकडील काही दिवसामध्ये भोगावतीसह सिनानदीला आलेल्या पुरामुळे पाण्याला वेग होता. परिणामी पाण्याच्या वेगाचा व खोलीचा अंदाज न आल्याने क्षणातच सौरभ बेंबलगे हा युवक पाहता पाहता नदीच्या पात्रात गायब झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी एका व्यक्तीने सांगितली.
यावेळी उपस्थित कंपनीचे कामगार मोठमोठ्याने ओरडण्याशिवाय काहीच करू शकले नाहीत. सदर घटना पोलीस प्रशासनाला समजताच ग्रामरक्षक दलाचे दत्तात्रय मोटे यांना घटनास्थळी पाठविण्यात आले . बघ्यांची गर्दी हटविण्याबरोबरच स्थानिक कोळ्यांच्या मदतकार्यातही होमगार्ड दत्तात्रय मोटे सहकार्य केले.
तहसिलदार राजशेखर लिंबाळे यांनी उशीरा घटनास्थळी भेट देऊन तलाठी , ग्रामसेवक व कोतवाल यांना काही सुचना देत आदेश दिले. तपास पोलीस करीत आहेत . दरम्यानच्या कालावधीमध्ये सिनानदीच्या पात्रामध्ये वाहुन गेलेल्या युवकांचा शोध घेण्यासाठी सिनानदीकाठालाच असलेल्या कोळेगांव येथील मच्छीमार बांधव अनुक्रमे ज्ञानेश्वर भुई , हरिचंद्र भुई , दत्ता भुई , लक्ष्मण भुई , सिंकदर पठाण, दिपक भुई व लक्ष्मण मल्लाव या सर्वांनीच त्यांच्याजवळच्या उपलब्ध साधनानिशी वेगाने वाहणाऱ्या सिना नदीच्या पात्रात बुडलेल्या युवकांचा शोध घेण्याचा प्रयत्न आज रविवारी सायंकाळपर्यत सुरु होता. आष्टे बंधाऱ्यापासून लांबोटीपर्यंत मच्छीमार कोळी बांधवांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतू वाहत गेलेला युवक संध्याकाळपर्यत मिळून आला नाही.