मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसत आहे. त्यातच आता रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दोन- तीन दिवासात अतिवृष्टीची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार रायगड जिल्ह्यात जोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
काल रविवारी सकाळी मुंबईत पावसाने चांगली हजेरी लावली. पहाटे, सकाळी आणि दुपारी साडेबारा वाजेपर्यंत मुंबईत बहुतांश ठिकाणी थांबून-थांबून मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत होत्या. दुपारी दोन नंतर मात्र पावसाने मुंबईत उघडीप दिली. त्यामुळे मुंबईकरांना सूर्यनारायणाने दर्शन झाले.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता आणखी तीव्र झाले आहे. येत्या २४ तासात त्याचा प्रभाव आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. कमी दाबाच्या क्षेत्राचा पुढील प्रवास पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेने होण्याची शक्यता आहे, याच्या परिणामामुळे पश्चिम किनारी पुढील तीन ते चार दिवस जोरदार वारे वाहतील. शिवाय राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोकण, मध्य महाराष्ट्रात याचा प्रभाव अधिक असणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त घाट भागातदेखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
* आजपासून तीन दिवस पाऊस
भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्याकडील माहितीनुसार, आज सोमवार, १३ सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मंगळवार, १४ सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बुधवार, १५ सप्टेंबर रोजी पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गुरुवार, १६ सप्टेंबर रोजी मात्र पावसाचा जोर थोडासा कमी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.