पंढरपूर : गेल्या अनेक वर्षांपासून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व ट्रक मालकांचे वाहतूकदर आणी कमिशन वाढवले नाहीच शिवाय त्यांच्यावर जप्ती सारख्या कारवाया कारखानदारांकडून केल्या जातात म्हणून आपल्या मागण्या कारखानदार व शासन दरबारी पोहोचविण्यासाठी 21 सप्टेंबर रोजी पंढरपूरमध्ये जनशक्ती संघटनेचे ट्रॅक्टर आंदोलन होणार असल्याचे जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी सांगितले.
पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर) येथे ऊस वाहतूक दर यांच्या प्रश्नासंबंधी जनशक्ती संघटनेची पहिली बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते याप्रसंगी बळीराजा जिल्हा प्रमुख रामदास खराडे, विठ्ठल मस्के, बळीराजा जिल्हा प्रमुख माऊली जवळेकर, किसान युवा क्रांतीचे प्रतापसिंह चंदनकर, गणेश वायभासे, रोहन नाईकनवरे, रामभाऊ खटके, अंकुश उपाळे, सागर पाटील, सोमनाथ जाधव, प्रकाश पवार उपस्थित होते.
कारखानदारी अडचणीत असल्याचे सांगून कारखानदार नेहमीच शेतकऱ्यांना व ऊस वाहतुकदारांना अडचणीत आणत आहेत. मग अडचणीत असलेला कारखानदार एका कारखान्याचे २-४ कारखाने कसा उभा करतो हे न सुटलेलं कोडं आहे. मात्र जिवाची ओढाताण करुन यांच्या कारखान्याला ऊस पुरवठा करणारा अजुनही अडचणीतच आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
डीझेलचे दर वाढले, ड्रायव्हरचा पगार वाढला, टायरांची किंमत वाढली तरीही वाहतूक कमिशन मात्र जैसे थे आहे. आपल्या जिवावर कारखानदार भले मोठे झाले मात्र ऊस वाहतुकदार ट्रॅक्टर व ट्रक मालकांची अधोगती झाल्याचा घणाघात अतुल खुपसे पाटील यांनी केला.
खूपसे पाटील म्हणाले, २०१५-१६ साली डिझेलचे दर ६५ रुपये प्रति लिटर होते आज ते १०० च्या घरात पोहोचले आहे. ड्रायव्हरचा पगार ६ हजार होता तो १५ हजार च्या पुढे झाला आहे. आणि टायर यांच्या किमती देखील वाढल्या आहेत. मात्र ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व ट्रक चे कारखानदारांनी वाहतूकदर आणी कमिशन आजही वाढवलेले नाही. शिवाय टोळी करार करण्यासाठी चार ते पाच लाखांचा ऍडव्हान्स कारखानदारांकडून दिला जातो. यामध्ये आपली रक्कम टाकून मुकादमाने सोबत करार करावा लागतो. अशात ही टोळी नाही आलीच किंवा पळून गेली तर याचे सर्वस्वी जबाबदारी ट्रॅक्टर व ट्रक मालकांवर राहते. आणि याचा फटका त्यांना बसतो. असे अनेक घाव सोसल्याने हजारो ऊस वाहतूकदार अडचणीत सापडले आहेत. का आत्महत्या सारखा पर्याय अवलंबला आहे. त्यामुळे आपण वेळीच एकत्र होऊन कारखानदारांच्या विरोधात आपल्या हक्कासाठी लढा दिला पाहिजे, असे सांगितले.
राजाभाऊ भिले, तानाजी जाधव, सुनील टिक, बिभीषण गमे ,अनिल पाटील ,सचिन शिंगटे ,नितीन तकिक ,गोपाळ पाटील, ज्योतिराम शिंदे, राजेंद्र जांबरे,ज्योतिराम ढोबळे, भाऊसाहेब गायकवाड, श्रीकांत नागणे, बालाजी पांढरे, विशाल माने, शिवाजी वळेकर, पोपट केचे, बंटी गायकवाड, कविराज मोहिते, सचिन गायकवाड, गणेश ढोबळे, राणा वाघमारे यांच्यासह इतर वाहन चालक मालक उपस्थित होते.