सोलापूर : दुसऱ्या मजल्यावरील धाबा झाडत असताना खाली कोसळल्याने महिला जागीच ठार झाली. ही घटना भवानी पेठेतील अन्नपूर्णा स्वीट जवळ आज सोमवारी सकाळच्या सुमारास घडली.
जगदेवी मल्लिनाथ कलशेट्टी (वय ४०) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. ती आज सकाळी घराच्या दुसऱ्या मजल्यावरील धाबा झाडत होती. अचानक तोल जाऊन खाली कोसळल्याने तिच्या डोक्यास मार लागून ती जागीच मयत झाली.तिच्या पश्चात पती एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. या घटनेची नोंद जोडभावीपेठ पोलिसात झाली. हवालदार पाटील पुढील तपास करीत आहेत.
* अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञातावर गुन्हा
सोलापूर : मजरेवाडी येथील शीतल पार्क येथून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण करण्यात आले.याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी बिरप्पा मलकारी सुंटे (वय-२४,रा. वांगी रोड,मंद्रुप,ता. दक्षिण सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यात म्हटले आहे की, १० सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास शीतल पार्क, मजरेवाडी येथील फिर्यादीच्या बहिणीच्या घरातून फिर्यादीचा पुतण्या बिरप्पा बनसिध्द सुंटे (वय-१७) याचे कोणीतरी अनोळखी व्यक्तीने अपहरण केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्याच रात्री ११ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या मोबाईलवर दुसऱ्या मोबाईलधारकाने फोन केला. तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे, तुम्ही कोंतम चौकात या, असे म्हणून फोन बंद झाला. तेव्हा फिर्यादी हे बहिणीला घेऊन तत्काळ कोंतम चौकात गेले,पण तेथे कोणीही नव्हते. त्यावेळी आलेल्या मोबाईल नंबरवर फोन केला असता तो मोबाईल स्वीच ऑफ होता.पुढील तपास फौजदार गायकवाड हे करत आहेत.
* कमी किमतीत गाडी देतो म्हणून कर सल्लागाराची फसवणूक
सोलापूर : कमी किमतीत दुचाकी घेऊन देतो म्हणून ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना २६ मार्च २०२१ रोजी घडली. याप्रकरणी विजेंद्र लक्ष्मणसा काटवे (वय-४९,रा. साखर पेठ, सोलापूर) यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून परसराम शिवानंद पाटील (रा.मु.पो.दिंडूर,ता.दक्षिण सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,कर सल्लागार विजेंद्र काटवे यांना वरील संशयित आरोपीने कामात हॉटेल समोरील कायझन अॅक्टिवा मोटर सायकल शोरूम मधून कमी किमतीत गाडी मिळवून देतो, असे म्हणून विजेंद्र यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी विजेंद्र काटवे यांच्या खात्यातून ७० हजार रुपये रोख रक्कम पाटील काढून बँक ॲप द्वारे भरून घेतली. मात्र फिर्यादी यांना नवीन मोटारसायकल न देता त्यांची फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद जेलरोड पोलिस ठाण्यात झाली असून, या घटनेचा पुढील तपास पोसई राठोड हे करीत आहेत.