सोलापूर : सलगर वस्ती परिसरातील पठाण शहादर्गाजवळ राहणारा आशुतोष नागेश वेळापुरे (वय२१) या अविवाहित तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली.
आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह घरातील छताच्या लोखंडी पाइपला फेट्याच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मयत आशुतोष हा एका दूध डेअरीत कामाला होता. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. या घटनेची नोंद सलगरवस्ती पोलिसात झाली असून यामागचे कारण समजले नाही. हवालदार उडानाशिव पुढील तपास करीत आहेत .
* अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी चालक ठार
सोलापूर – मार्केटयार्ड ते शेळगी रोडवरील रब्बी ज्वारी केंद्राजवळ अनोळखी वाहनाच्या धडकेने दुचाकीवरील गुलाब नागप्पा माळी (वय ५६ रा. जवाहरनगर, शेळगी) हे गंभीर जखमी होऊन मरण पावले. हा अपघात काल बुधवारी रात्रीच्या सुमारास घडला.
गुलाब माळी हे काल रात्रीच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून बाळे येथील विद्युत मंडळाच्या कार्यालयाकडे कामाकरिता निघाले होते. त्यावेळी समोरून अनोळखी वाहन धडकल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ते उपचारापूर्वीच मयत झाले. या अपघाताची नोंद जोडभावी पेठ पोलिसात झाली आहे.
* घरातून मोबाईलसह रक्कम लंपास
सोलापूर : कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरातून मोबाइल व रोख रक्कम असा मिळून २१ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना १३ ते १४ सप्टेंबर दरम्यान राहुल गांधी झोपडपट्टी, सोलापूर येथे घडली. याप्रकरणी सुरज प्रभाकर जाहीरे (वय -२३,रा. राहुल गांधी झोपडपट्टी,सोलापूर) यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी सुरज जाहीरे यांच्या घराचा दरवाजा कोणीतरी अज्ञात चोरट्याने ढकलून घरात प्रवेश केला. त्यावेळी घरातून दहा हजार रुपयांची रोख रक्कम व दोन मोबाईल असा एकूण २१ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. या घटनेची नोंद जेलरोड पोलिस ठाण्यात झाली असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक जाधव हे करीत आहेत.
* एटीएम कार्ड चालू करण्याच्या बहाण्याने तरुणावर जीवघेणा हल्ला
सोलापूर : एटीएम कार्ड चालू करायचे आहे म्हणून तरुणाला बोलवून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना १५ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास विकास नगर सोलापूर येथे घडली. याप्रकरणी श्री सेल पुंडलिक केंगार (वय-१९, रा. सोलापूर ) यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून खंडू आयवळे (रा. निंबर्गी, सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादीचा चुलत भाऊ आदित्य केंगार चुलत मामा खंडू आयवळे हे दोघे फिर्यादीच्या विकास नगर येथील ऑफिस जवळ आले. त्यानंतर फिर्यादीला त्याचा चुलत मामा खंडू आयवळे यांनी एटीएम कार्ड चालू करायचे आहे, असे सांगून फिर्यादीला मोटारसायकलवर बसवून मसिहा चौकाकडे आणले. त्यानंतर खंडू आयवळे याने कोणत्यातरी कारणावरून धारदार हत्याराने फिर्यादी श्रीशैल केंगार यांच्या गळ्यावर वार करून जीव ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद सदर बाजार पोलीस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास पोसई जाधव हे करीत आहेत.