सोलापूर : पुण्यात गणपतीचे दर्शन घेण्यास निघालेल्या तरुणाचा रेल्वेतून तोल जावून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा तरुण सोलापूर शहरातला आहे. पुणे येथील दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी हा तरुण निघाला होता. पण त्याच्यावर काळाने घाला घातला. सोलापूर – पुणे असा रेल्वेने प्रवास करत असताना दमाणीनगर येथील रुळावर तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाला.
कपिल अंबादास गुंडला (वय 35, रा. कामगार वसाहत, सुनीलनगर, एमआयडीसी) असे या अपघाता मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद सोलापूर लोहमार्ग पोलिसांत आकस्मात मृत्यू म्हणून झाली आहे. दर्शनाला पोहचण्याअगोदरच सोलापुरातच त्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्याबरोबर काही मित्रही होते.
सविस्तर हकीकत अशी की, गाडी क्रमांक 01014 कोईमतूर-कुर्ला एक्स्प्रेसने कपिल गुंडला आणि त्याचे मित्र बुधवारी (ता. 15) पुण्याला जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करीत होते. कपिल गुंडला हा त्याच्या इतर पाच मित्रांसमवेत पुणे येथील दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जात होता. दमाणीनगर परिसरातून रेल्वे जात असताना कपिल गुंडला हा बाथरुमला जातो, असे सांगून दाराजवळ आला असता त्याचा तोल गेला. तो खाली पडला व त्याच्या डोक्यास मार लागून गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावला. मात्र याबाबत या दुर्दैवी घटनेची त्याच्या मित्रांना उशिरा माहिती मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्याच्याजवळ असलेल्या कागदपत्रांवरून त्याची ओळख पटवण्यास पोलिसांना मदत झाली. ओळख पटल्यानंतर त्याच्या नातलगांना आणि मित्रांना सांगण्यात आले. मृताच्या नातेवाइकांना आणि मित्रांना याविषयी माहिती देताच त्याच्याबरोबर प्रवास करणारे इतर मित्र मोहोळ स्थानकावर उतरून खासगी वाहनाने सोलापूर रेल्वे स्थानकावर आले. मित्राच्या मृत्यूची माहिती समजताच मित्रांनी शोक व्यक्त केला. मित्राचा मृतदेह पाहून इतर मित्रांच्या अंगावर शहारे आले. या घटनेची नोंद लोहमार्ग पोलिसात झाली असून पोलीस अधिक तपास घेत आहेत.
* अल्पवयीन मुलीचा विनयभंग, चिकन दुकानदारावर गुन्हा