विजयवाडा / मुंबई : आंध्र प्रदेश सरकारनं तिरुमला तिरुपती देवस्थानासाठी नव्या ट्रस्ट बोर्डाची स्थापना केलीय. या ट्रस्टमध्ये महाराष्ट्रातील शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांचा समावेश आहे. या बोर्डाच्या सदस्यांची प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना नावे सुचवतात. उद्धव ठाकरे यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्याशी फोनवरून संवाद साधून ट्रस्टच्या सदस्यपदासाठी मिलिंद नार्वेकर यांचं नाव सुचवल्याचं वृत्त आहे.
नार्वेकरांना मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक म्हणून ओळखलं जातं. कोकणातील दापोलीत, समुद्रकिनारी असलेला मिलिंद नार्वेकरांचा बंगला पाडण्यात आला आहे. नियमांचं उल्लंघन करून, अवैधरित्या हा बंगला बांधल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यामुळे गेल्याकाही दिवसांपासून मिलिंद नार्वेकर चर्चेत आहेत.
या नियुक्तीमुळे नार्वेकरांच्या खांद्यावरील जबाबदारी वाढली असून, त्यांचे वलय देशपातळीवर विस्तारल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, याआधीच मुंबई क्रिकेट संघटनेच्या मुंबई प्रीमिअर लीग आणि गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदाची धुरा शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या खांद्यावर आहे.
तिरुपती देवस्थानचे ट्रस्ट बोर्डाच्या सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर आता मिलिंद नार्वेकर यांच्या कामाची कक्षा देश पातळीवर रुंदावल्याचं म्हटलं जातंय. आंध्र सरकारनं नुकतंच वाय व्ही रेड्डी यांची सलग दुसऱ्यांदा तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्ट बोर्डाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. या बोर्डाच्या सदस्यांच्या नियुक्तीसाठी प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना नियुक्तीसाठी नावे सुचवत असतात.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेस प्रमुख वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्याशी फोनवरून संवाद साधून ट्रस्टच्या सदस्यपदासाठी मिलिंद नार्वेकर यांचं नाव सुचवल्याचं समजतंय. त्यानंतर आंध्र सरकारकडून 28 सदस्यांच्या यादीत मिलिंद नार्वेकरांच्या नावाचाही समावेश करण्यात आलाय.