मुंबई : लोककलावंत सुरेखा पुणेकर आणि गायिका देवयानी बेंद्रे यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते बबनराव गवस, मनसेच्या नेत्या मनिषा खैरे, अशोकराव सवने, प्रभाकर शेट्ये, संजय त्रिपाठी, सुरेश बागवे, नितीन पाटील, ओंकार गवस यांनीही आज राष्ट्रवादीत प्रवेश केला.
वयाच्या आठव्या वर्षापासून पारावरचा तमाशा ते लावणी व टीव्ही शो-चित्रपट असा जिद्दीचा प्रवास केलेल्या सुरेखा पुणेकर आज चित्रपट, कला, साहित्य आणि सांस्कृतिक विभाग मुंबईचे प्रदेशाध्यक्ष मनोज व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
त्या म्हणाल्या, “लोककला सादरीकरणाच्या निमित्ताने छोट्याशा खेड्यापासून शहरांपर्यंतचा आजवर खूप मोठा प्रवास मोठा झाला.गोरगरीब जनतेचे प्रश्न अडचणी जवळून पहिल्या, खूप वाटायचे त्यांच्या समस्या मांडाव्यात, सोडवून घ्याव्यात; परंतु भावनिक होऊन गप्प बसण्याशिवाय पर्याय नव्हता. प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय ताकद असायला हवी म्हणूनच मी राष्ट्रवादीची निवड केली असल्याचे पुणेकर म्हणाल्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सुरेखा पुणेकर म्हणाल्या की, ‘दरेकरांचं फार चुकलं. तुम्ही महिलांना संरक्षण, मान देऊ शकत नाही. तर निदान बोलू तरी नका ना. तुम्हाला महिलांविषयी बोलायचा काही अधिकार नाही. तुम्ही पुरुषांविषयी बोला, पण महिलांविषयी बोलू नका. आज जर महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला पेटल्या तर काय होईल, म्हणून अशी विधान कुठे करू नका. एवढा मोठा पक्ष आहे आणि एवढ्या मोठ्या पक्षातील माणूस असा बोलतं असेल तर अख्ख्या महाराष्ट्रातील महिलांवर काय परिणाम होतो आणि काय झालायं.’
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सुरेखाताईं पुणेकर यांचे मंचावरील काम महाराष्ट्राने पाहिले आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब मुख्यमंत्री असल्यापासून राज्य सरकारने कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. त्यानंतरही महाराष्ट्राच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी कलेची जपणूक करण्याची ही परंपरा सुरु ठेवली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जसे सर्व जाती – धर्मातील लोक आहेत. त्याप्रमाणेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा देखील सहभाग असला पाहिजे ही शरद पवारसाहेबांची भूमिका असल्याचे सांगितले.
दरम्यान, पुणेकर यांच्या पक्षप्रवेशापूर्वी भाजपाचे प्रवीण दरेकर यांच्या एका वक्तव्यामुळे राजकारण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे, अशी टिपण्णी विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली होती. यासंदर्भात बोलताना पुणेकर म्हणाल्या, “राष्ट्रवादी काँग्रेस हा महिलांचा आदर करणारा पक्ष आहे. प्रवीण दरेकर फार चुकीचं बोलले. त्यांना महिलांचा आदर करता येत नसेल तर अवहेलना तरी करु नका. त्यांनी जाहीर माफी मागावी. अन्यथा त्यांना खूप त्रास होईल”
“सगळ्या पक्षांमध्ये लोककलावंत आहेत. माझा पक्षप्रवेश आहे म्हणून दरेकर असे का बोलले. दरेकरांच्या वक्तव्यामुळे लावणी क्षेत्रातील स्त्रियांना खूप वाईट वाटलं. माझ्यासारखी महिला एवढ्या कष्टाने जर घडत असेल. मात्र आज दरेकरांसारखे विरोधी पक्षनेते असे विधान करतात, हे चुकीचे आहे. भाजपा सारख्या पक्षात प्रवीण दरेकर सारखे नेत्यांचा काही उपयोग नाही.”, असे सुरेखा पुणेकर म्हणाल्या होत्या.
“राष्ट्रवादीत प्रवेश करून मला आनंद झाला. माझं स्वप्न होतं राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचं ते आज पूर्ण झालंय. दरेकरांनी जे म्हटलं ते ऐकून वाईट वाटलं. माझा पक्षप्रवेश आहे म्हणून दरेकर असे का बोलले. त्या वक्तव्याचा मी निषेध करते. त्यांनी तसं बोलायला नको होतं,”
– सुरेखा पुणेकर