सोलापूर : ग्रामपंचायत शिपायाच्या घरी जाऊन ठरावाचे रजिस्टर घेतले आणि ठरावावर असलेल्या सदस्यांच्या सह्यावर व्हाइटनर लावून खाडाखोड केली. आणि ते रजिस्टर शिपायाच्या तोंडावर फेकून शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी महिला ग्रामपंचायत सदस्याच्या पतीविरुद्ध तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना कारंबा (ता. उत्तर सोलापूर) येथे बुधवारी (ता. १५) सायंकाळी घडली. या प्रकरणात पोलिसांनी औदुंबर पांडुरंग भोरे (रा.कारंबा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. यासंदर्भात नीलम प्रल्हाद उघडे या महिला ग्रामसेवकांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. ग्रामपंचायत सदस्य सविता भोरे यांचे पती औदुंबर भोरे हे बुधवारी सायंकाळी ग्रामपंचायत शिपाई चव्हाण यांच्या घरी गेले. ठरावाचे रजिस्टर मागून घेऊन त्याच्यावर असलेल्या सदस्यांच्या सह्यांवर व्हाईटनर लावून खाडाखोड केली. खाडाखोड केलेले ते रजिस्टर चव्हाण यांच्या अंगावर फेकून देऊन सरकारी कामात अडथळा केला, अशा आशयाची फिर्याद ग्रामसेवक उघडे यांनी पोलिसात दाखल केली. पुढील तपास सहाय्यक फौजदार चव्हाण हे करीत आहेत .
* मोहोळच्या बँकेसमोरुन हातोहात चार लाख लांबवले
मोहोळ : स्टेट बँकेच्या खात्यावर जमा झालेली लाइफ इन्शुरन्स पॉलिसीची रक्कम काढून ती मोटरसायकलच्या हँडलला लाऊन जाण्याच्या तयारीत असताना अचानक तोंडाला काळी पट्टी बांधलेल्या युवकांने तुमचे पैसे तिकडे पडले आहेत, अशी दिशाभूल करून मोटरसायकलला अडकवलेली ३ लाख ९७ हजार रुपयांची रोख रक्कम असलेली पिशवी हातोहात लंपास करून पोबारा केला. ही घटना १७ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास मोहोळ शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या समोर घडली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, अनगर येथील लोकनेते कारखान्यावर फिटरचे काम करणारे शंकर राजाराम होनमोटे हे १७ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता च्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मध्ये येऊन खात्यावर जमा असलेली पॉलिसीची रक्कम ३ लाख ९७ हजार रुपये ही रक्कम घेऊन बाहेर उभे असलेल्या मोटरसायकलला अडकवून निघण्याच्या तयारीत होते.
याचवेळी तोंडाला काळी पट्टी बांधलेल्या २५ वर्षीय युवकाने तुमचे पैसे पलीकडे पडले आहेत, अशी दिशाभूल केली. दरम्यान पडलेली रक्कम पाहण्यासाठी दुचाकीवरुन उतरुन होनमोटे हे तिकडे पहात असतानाच गाडीला अडकवलेली पैशाची पिशवी हातोहात काढून पोबारा केल्याची घटना स्टेट बँकेच्या समोर घडली. याबाबत होनमोटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एका अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने हे करत आहेत.