बार्शी : व्यवसाय वृध्दीसाठी कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून संगनमताने लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी धिरज मनोहर गायकवाड व अनिल रघुनाथ भुते (दोघेही रा. बसस्थानकाजवळ मुसलमानवाडी, इचलकरंजी, हातकणंगले जि. कोल्हापूर ) या दोघांच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांकडे वारंवार तक्रारी करुनही त्यांनी दखल न घेतल्यामुळे अभिमान सटवाजी कवडे (रा. कँन्सर हॉस्पिटलजवळ वाणी प्लॉट, बार्शी) यांनी ऍड. महेश जगताप यांच्यामार्फत दिलेल्या खाजगी फिर्यादीवरुन प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी राहुल धडके यांनी दिलेल्या आदेशावरुन हा गुन्हा दाखल झाला आहे.
कवडे यांचा घराचे दरवाजे विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्या घराजवळ आरोपी गायकवाडचे सासरे संभाजी सोत्रे राहतात. आरोपींच्या सासुरवाडीला नेहमी येण्याजाण्यातून कवडे यांच्याशी त्यांची प्रथम ओळख व नंतर मैत्री झाली होती. कवडे यांना व्यवसायासाठी 2 लाख रुपयांचे कर्ज हवे होेते. आरोपीने साई फायनान्स मधून जादा कर्ज कमी व्याजदराने मिळवून देतो, त्यासाठी प्रोसेसिंग फी द्यावी लागेल, असे सांगून त्यांच्याकडून आपल्या बँक खात्यात वेळोवेळी रु. 2,43,950 रु मागून घेतले. तसेच आपला मित्र अनिल भुते याच्या खात्यात वेळोवेळी 27,110 रुपये भरावयास लावले. आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांच्या खात्यावर सुमारे 20 लाख रुपये भरले आणि तांत्रिक त्रुटीच्या आधारे ते परत काढून घेतले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कर्जाबाबत विचारणा केली असता काहीतरी तांत्रिक अडचण झालेली आहे. तुम्हास आणखी पैसे भरावे लागतील, साहेबाला खुश करण्याकरिता रक्कम लागणार आहे. तुम्ही रक्कम जेवढ्या लवकर देताल तेवढ्या लवकर तुमचे काम होणार आहे, असे म्हणून आरोपीने फसवणूक केल्याचे म्हटले आहे.
* छोटा हत्तीच्या धडकेने वृध्द शेतकरी गंभीर जखमी
बार्शी : छोटा हत्तीने लूनाला दिलेल्या धडकेमुळे वृध्द शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना कुर्डवाडी रस्त्यावरील चंडक पेट्रोल पंपासमोर घडली आहे. याबाबत जखमीचा मुलगा किरण प्रकाश गुंड (रा. कसबा पेठ, बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिस ठाण्यात छोटा हत्तीचा चालक बिरबल बाबुराव म्हेत्रे (रा.वाणी प्लॉट, बार्शी ) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
प्रकाश दत्तात्रय गुंड कुटुंबाची शेतजमीन चंडक पेट्रोलपंपामागे आहे. ते उडीद काढणेसाठी आपला मुलगा व सूनेसह सकाळी शेतात गेले होते. दुपारी जेवणासाठी कसबा पेठेतील आपल्या घरी लूनावरुन परतत असताना पेट्रोल भरण्यासाठी थांबले होते. चंडक पेट्रोल पंपावर पेट्रोल भरुन बाहेर येत असताना बार्शीकडून कुर्डवाडीकडे जाणार्या छोटा हत्ती (क्र. एम.एच.45/7314) ने त्यांच्या लूनाला धडक दिली. त्यामुळे ते खाली रस्त्यावर पडले. त्यांच्या डोक्यास व पायास गंभीर जखम झाली. त्यांना मुलाने उपचारासाठी लागलीच हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे सुमारे 20 हजाराचे नुकसान झाले आहे.