बार्शी : अवैध सावकारी प्रकरणी येथील कापड बाजारातील श्री ज्वेलर्स या दुकानावर सहकार विभागाच्या पथकाने आज गुरुवारी धाड टाकली आणि तेथील दस्ताऐवज जप्त केले. तसेच या दुकानाचे मालक अशोक लंगोटे यांच्या तालुक्यातील उपळाई (ठोंगे) येथील घरावरही दुसर्या पथकाने धाड टाकून तेथील दस्ताऐवज जप्त केले.
या धाडीमध्ये सापडलेल्या दस्ताऐवजाची तपासणी परिवीक्षाधीन सहाय्यक निबंधक अमोल निरडे करीत आहेत. गणिता गव्हाळे यांनी अशोक लंगोटे यांच्या अवैध सावकारीप्रकरणी सहकार विभागाकडे तक्रार केली होती. त्याच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी दिलेल्या आदेशानुसार सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी सचिन महाडीक यांनी आपल्या सहकार्यांसमवेत श्री ज्वेलर्समध्ये जावून तेथील रजिस्टर, कोरे चेक, कोर्या पावत्या आदी सावकारीविषयक कागदपत्रे जप्त केली. तसेच सहकार अधिकारी मनिषा गुप्ता यांच्या पथकाने लंगोटे यांच्या घरी जावून तेथे असलेले कोरे चेक, खरेदी खते, नोंदवह्या आदी कागदपत्रे जप्त केली आहेत.
* फसवणुकीप्रकरणी मुख्याध्यापक व लिपिकाविरोधात गुन्हा दाखल
बार्शी : संस्थाध्यक्ष व सचिवांच्या बनावट सह्या करुन, खोटे शिक्के तयार करुन, सेवापुस्तिकेत खाडाखोड करुन 61 हजार रुपयांचा अपहार करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तालुक्यातील वैराग येथील विद्यामंदीर प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका जे.के. जहागिरदार व वरिष्ठ लिपिक नंदकुमार धन्यकुमार रणदिवे यांच्याविरोधात वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत संस्थेचे अध्यक्ष भुषण जयंत भूमकर यांनी फिर्याद दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
विद्यामंदीर संस्थेच्या विद्यामंदीर प्रशालेमध्ये जहागिरदार या 1 डिसेंबर 2009 पासून 31 मे 2014 पर्यंत मुख्याध्यापिका पदावर कार्यरत होत्या. याच दरम्यान नंदकुमार रणदिवे हे वरिष्ठ लिपिक होते. मुख्याध्यापिकेंच्या सेवानिवृत्तीचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे संस्थेमार्फत संस्थाध्यक्ष व सचिवांच्या सहीने दाखल करणे बंधनकारक आहे. असे असताना वरील दोघांनी संगनमताने अध्यक्ष व सचिव यांचे खोटे शिक्के तयार करुन आणि खोट्या सह्या करुन परस्पर श्रीमती जहागिरदार यांचा पेंशन प्रस्ताव दाखल केला. त्याचबरोबर सेवापुस्तिकेतील रजेच्या तपशीलामध्ये खाडाखोड करुन नियमबाह्य रजा नेांद करुन 32 परावर्तित रजेचे 62 हजार रुपये उचलून त्याचा अपहार करुन शासनाची फसवणूक केली. त्याचप्रमाणे स्वत:चा पुतण्या मनोज बाहुबली रणदिवे यास पुर्णवेळ ग्रंथपाल करण्यासाठी जहागिरदार निवृत्त झाल्यानंतरही त्यांच्या सहीने शिक्षणाधिकार्यांना सादर करुन फसवणूक केली. याप्रकरणी पुढील तपास पो.उपनि. राजेंद्र राठोड करीत आहेत.
* बागवान नगरात दीडलाखांची घरफोडी
मोहोळ : मोहोळ शहरातील बागवान नगरात चोरट्यांनी घरफोडी करून रोख रक्कमेसह सोन्याचे दागीने असा एक लाख पासस्ट हजार रूपयाचा ऐवज चोरून पोबारा केला आहे.
याबाबत पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहोळ येथील रमजान अब्दुल बागवान (रा .बागवान नगर मोहोळ ) यांचा फळविक्री करण्याचा व्यवसाय आहे . बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून रमजान बागवान व त्यांचे कुटुंबातील सहा सदस्य हॉलमध्ये एकत्र झोपले होते . तर शेजारील दोन खोल्यांना बाहेरून कुलूप लावले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास स्वयंपाकघराचे बाहेरून लावलेले कुलुप तोडुन घरात प्रवेश केला.
रमजान बागवान यांनी लक्ष्मी गणपतीच्या या सणासाठी उधार आणलेल्या फळविक्रेत्याचे पैसे देणे देण्यासाठी ठेवलेले रोख 120,000 रुपये व गोदरेज कपाटातील सोन्याचे दागिणे ( अंदाजे किंमत पंचेचाळीस हजार रूपये ) घेऊन अज्ञात चोरटे फरार झाले.सकाळी सव्वासहाच्या दरम्यान झोपलेल्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद आहे . हे लक्षात आल्यानंतर परिसरातील लोकांना ओरडुन बाहेरून लावलेली कडी उघडावयास लावले. तेव्हा बाहेर आल्यानंतर सदर दोन खोलीचे तोडलेले कुलुप व अस्ताव्यस्त पडलेले साहीत्य पाहील्यानंतर अज्ञात चोरटयांनी चोरी केली आहे, अशी फिर्याद रमजान बागवान यांनी दाखल केली आहे. वाढत्या घरफोड्यामुळे नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले असुन पोलीसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकातुन होत आहे . याबाबतचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव करित आहेत.