बीड : बीड येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणी आरोपी अब्दुल रहमान उर्फ एरार नवाब हाश्मी यास पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आज ठोठावली.
या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, बीड येथे राहणार्या एका अल्पवयीन मुलीने 11 मे 2018 रोजी पोलिस ठाणे शिवाजीनगर येथे आरोपी अब्दुल रहमान उर्फ एरार याने सकाळी लाईफ लाईन हॉस्पीटल जवळ तिचा विनयभंग करुन तिला मारहाण केली, अशा आशयाची फिर्याद मुलीने दिली होती. सदर मुलीच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आरोपी अब्दुल रहमान उर्फ एरार याचे विरुध्द भारतीय दंड विधान संहिता कलम 354, 323 व पोक्सो कायद्याचे कलम-12 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
तपासाअंती पोलिसांनी सदर आरोपीविरुध्द बीड येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात आरोप पत्र दाखल केले होते. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे आरोपीविरुध्द गुन्हा सिध्द करण्यासाठी पिडीत मुलीसह एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाने सादर केलेल्या भक्कम पुराव्याचे आधारे व विशेष सरकारी वकील अॅड. मंजुषा दराडे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन बीड येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री एच.एस.महाजन यांनी आरोपी अब्दुल रहमान उर्फ एरार यास पोक्सो कायद्याचे कलम 7 व 8 अंतर्गत तसेच भादवि 323 अंतर्गत दोषी धरुन त्यास पोक्सो कायद्याचे कलम 7 व 8 अंतर्गत पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच भादंवि 323 अंतर्गत एक वर्ष शिक्षा व एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
प्रकरणात तपासी अधिकारी म्हणून आर.ए.शेख, जी.एस.कोलते यांनी आरोपीविरुध्द गुन्ह्याचा तपास केला व शासनातर्फे न्यायालयात विशेष सरकारी वकील अॅड. मंजुषा एम.दराडे यांनी शासनाची बाजू मांडली. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून इंगळे व पोलिस शिपाई नागरगोजे यांनी कोर्टपैरवी म्हणून काम केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* राज्यातील स्त्री अत्याचाराच्या वाढत्या घटना चिंताजनक !
राजकारणाचा फारसा अनुभव नसताना कोरोनाकाळात योग्यवेळी योग्य निर्णय घेऊन आणि उत्तम नियोजन करून अल्पावधीत लोकप्रिय झालेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांना राज्यात स्त्री अत्याचाराच्या वाढत्या घटनांवरून विरोधी पक्षाने लक्ष्य केले आहे. डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर ३० हुन अधिक नराधमांनी बलात्कार केल्याची घटना वृत्तपत्रात वाचतानाच नगर जिल्ह्यात एका ८० वर्षीय वृद्धेवर २१ वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याप्रकरणी त्याला सत्र न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावल्याचे वृत्त वाचनात आले. छत्रपती शिवरायांचा आणि राजमाता जिजाऊंचा वारसा लाभलेल्या राज्याचे दिवसागणिक होत असलेले नैतिक अध:पतन पाहून मन विषिन्न होते. ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’ने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात २०२० सालात बलात्काराच्या २ हजार ६१ घटना घडल्या असून या आकडेवारीत महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर आहे. अर्थात ही आकडेवारी केवळ नोंद झालेल्या गुन्ह्यांची असून बदनामीच्या भयामुळे आणि पोलीस यंत्रणेतील भ्रष्टाचारामुळे स्त्री अत्याचारांच्या कित्येक घटनांची कागदोपत्री नोंदही होत नाही. कायद्यांतील पळवाटांचा आधार घेऊन आणि राजकीय दबावाचा वापर करून स्त्री अत्याचाराची अनेक प्रकरणे दाबली जातात हे सर्वज्ञात आहे, त्यामुळे वासनांधांना अधिक बळ मिळते. ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांनी बलात्काऱ्याचा ‘चौरंगा’ करण्याची शिक्षा देऊन तत्कालीन स्त्रियांचा सन्मान केला त्याच महाराष्ट्रातील स्त्री आज असुरक्षिततेचे जीवन जगत आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या पक्षाचे पक्षप्रमुख आहेत. स्त्री अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या प्रकरणी त्यांनीच लक्ष घालून कठोर पावले उचलावीत आणि राज्यातील स्त्रियांना आश्वस्त करावे !
* जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई