अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणातून सकाळी १४०० क्युसेक पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर परत दुपारी २१०० क्युसेक तर सायंकाळी प्रवाहात वाढ करुन सध्या २४०० क्युसेक इतके पाणी खाली सोडण्यात आले आहे. यामुळे नदीकाठावरील शेतकरीबरोबर तलाठी,मंडल अधिकारी ,पोलीस पाटील व कोतवाल यांना नदीकाठच्या भागातच थांबण्याचा इशारा तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी दिला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने बोरी व हरणा या दोन्ही ही नदीतील नळदुर्ग धरणातून ही प्रवाह वाढवण्यात आल्याने बोरी धरणातून आज संध्याकाळपर्यंत अजून प्रवाहात वाढ होऊन २४०० क्युसेक इतके पाणी खाली सोडण्यात आले आहे.
तरी नदीकाठावरील सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.तसेच खासपूर आणि चांदणी मध्यम प्रकल्पातून ही पाणी सोडल्यामुळे भीमा सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. संध्याकाळी बोरी उमरगे येथील पुलावर दुसऱ्यांदा पाणी येण्याची शक्यता होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तालुक्यात उत्तरा नक्षत्राच्या दमदार आगमनाने एकीकडे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे कुरनूर धरणातून मोठ्याप्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे अक्कलकोटवासीयांची जीवनदायिनी ठरलेले कुरनूर धरण पुन्हा एकदा ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे.
तालुक्यातील अन्य गावांतील लहान-मोठे तलाव, ओढे देखील भरून वाहताना दिसून येत आहे.
धरणाच्या वरील भागातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह येत असल्याने सध्या कुरनूर धरणातून पाणी खालच्या बाजूस मोट्याळ, बावकरवाडी, सांगवी बु येथील नदीपात्रात सोडले जात आहे. यामुळेच बोरी नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी वाढली आहे. म्हणून तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गरज पडल्यास नागरिकांचे स्थलांतर करून त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे, व त्यांना निवारा लाईट, पाण्याची व्यवस्था करण्याचे फर्मान तहसीलदार यांनी स्थानिक पातळीवरील कर्मचाऱ्यांना दिले. सांगवी बु, खु, बोरीउमरगे, यासह बोरी नदीकाठच्या सर्व गावांना तहसीलदार यांनी भेट देत आहेत.
आणखीन पाणी वाढण्याची शक्यता नाकारता येत आहे. त्यामुळे, नदीकाठच्या सर्व नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा देण्यात येत आहे. आणि वेळोवेळी स्थानिक पातळीवरील सर्व प्रशासनाचे कर्मचारी माहिती देत राहतील तसेच नागरिकांना सुरक्षित स्थळी ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. नागरीकांनी ही सतर्क राहावे व सरपंच, उपसरपंच, सदस्य, पुढारी यांनी वेळोवेळी दक्षता घ्यावी, असे आवाहन केले आहे.