नाशिक : नाशिकमध्ये पुन्हा एकदा गोदावरी नदीला पूर आला आहे. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पुराचे पाणी आले असून, प्रशासनाने नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला आहे. नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा धरणातून एकूण 3000 क्यूसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
पुन्हा एकदा गंगापूर धरणातून विसर्ग सुरू केल्याने हा वर्षातला तिसरा पूर गोदावरीला आला आहे. सध्या नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे आज मंगळवारी दुपारी बारापासून पुन्हा एकदा धरणातून एकूण 3000 क्यूसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे गोदावरी नदी पुन्हा एकदा ओसंडून वाहते आहे.
दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आले असून, नागरिकांनी नदी क्षेत्रात जावू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, आज नाशिकमध्ये पहाटे पावणेचारपासून पावसाने हजेरी लावली आहे. दुपारी बाराच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. त्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची हजेरी होती. सध्या धरण क्षेत्रातही अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे. त्यामुळे गंगापूर धरण समूह भरत आला आहे. त्यातील गंगापूर धरण 100 टक्के भरले आहे. काश्यपी धरण 98 टक्के भरले आहे. गौतमी गोदावरी धरणही 100 टक्के भरले आहे, तर आळंदी धरण 99 टक्के भरले आहे. हवामान विभागाने आज दिवसभर जिल्ह्यात अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे दुपारी बारापासून गंगापूर धरणातून पुन्हा एकदा एकूण 3000 क्यूसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नाशिकमध्ये पुन्हा पूरसदृष्य परिस्थिती. गोदाकाठावरील मंदिरे व दुकाने पाण्याखाली गेली आहेत. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणीपातळी वाढली असून अद्याप पाऊस चालूच असल्यामुळे विसर्ग वाढल्यास पाणी पातळी अजून वाढण्याची शक्यता आहे.
सध्या गिरणा धरणावरील नाग्या-साक्या व अन्य बंधाऱ्यातून दहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने आणि या पुढील पाच दिवस जळगाव सह नाशिक जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला असल्याने गिरणा धरण क्षेत्रावरील गावात पडणाऱ्या पावसाकडे गिरण पाटबंधारे विभागाचे लक्ष असून पावसाचे सातत्य असेच कायम राहिल्यास कोणत्याही क्षणी गिरणा धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी येऊ शकते.
मुंबईच्या प्रादेशिक मौसम विज्ञान केंद्राच्या सूचनेनुसार 28 सप्टेंबर रोजी विभागातील नाशिकसह काही जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. नाशिक जिल्ह्यातील काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सर्व पूर प्रवण क्षेत्रातील गावांनी सावधानतेच्या अनुषंगाने नदी-नाले काठच्या परिसरातील लोकांनी सतर्क राहावे. नदी व धरण पात्रात कोणी उतरू नये. नागरिकांनी आपले पशुधन, वाहने सुरक्षित स्थळी ठेवावीत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भागवत डोईफोडे यांनी केले आहे. दरम्यान, गुलाब चक्रीवादळामुळे उत्तर महाराष्ट्राला पुन्हा पाऊस झोडपून काढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नाशिक जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.