सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बलात्कार प्रकरणातील आरोपीस सोलापूर जिल्हा सत्र विशेष न्यायाधीश यांनी ७ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड ठोठावला आहे.
या घटनेतील अधिक माहिती अशी की, पीडित महिला २१ जानेवारी २०१४ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास एकाच्या शेतातून जळणासाठी लाकडे आणण्यासाठी गेली होती. तिच्या पुढे तिच्या दीराची मुलगीही तिच्या वडिलांना डबा देण्यासाठी गेली होती. आणि पीडित महिला लाकडे तोडून भारे बांधत असताना तेथे त्यांच्या गावातील अमोल विठ्ठल सोनकांबळे हा आला. त्याने तू एकटीच आली आहे का? असे विचारले. तिने माझ्या सोबत माझ्या दीराची मुलगी आली आहे, असे सांगितले. तेव्हा आरोपीने ती कुठे आहे असे विचारले असता, पीडिता म्हणाली की, ती तिच्या वडिलास डबा देण्यास गेल्याचे सांगितले. तेव्हा आरोपीने तिला धरुन खाली पाडले व ओरडलीस तर तुला खल्लास करेन, असे धमकावून तिच्या तोंडावर हात दाबला व नंतर तुला
खल्लास करतो, असे बोलून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर गावातील एक मुलगा आल्याने आरोपी पळून गेला. पीडिता ही रडत रडत घरी गेली व तिच्या सासू, दीर व जाऊ यांना घडला प्रकार सांगितला. त्यानंतर सदर घटनेची फिर्याद २१ जानेवारी २०१४ रोजी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे येथे दाखल केली होती.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण ९ साक्षीदार तपासले गेले. यापैकी फिर्यादी घरी रडत जात असताना पाहणारे साक्षीदार व डॉक्टर आणि फिर्यादी यांची सदरच्या प्रकरणामधील तपासणी अंमलदार यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सदर कामी सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद न्यायाधीश यू.एल. जोशी यांनी ग्राह्य धरुन आरोपीस भारतीय दंड विधान कलम ३७६ अन्वये ७ वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक महिना साध्य कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाच तपासी अंमलदार म्हणून पोलीस उपनिरीक्षक पी.टी जराड व कोर्ट पैरवी म्हणून पो.कॉ. डी. वाय. कोळी यांनी काम पाहिले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* माचणूर नरबळी प्रकरणातील आरोपीचा पुण्यात मृत्यू
मंगळवेढा : माचणूर येथील प्रतीक शिवशरण याच्या नरबळी प्रकरणात कळंबोली कारागृहात असलेले शिक्षण संस्थाचालक तथा आरोपी नानासाहेब डोके याचा आजारी असताना उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबतचा संदेश मंगळवेढा पोलीस ठाण्याला प्राप्त झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
२७ ऑक्टोबर २०१८ रोजी माचणूर येथील प्रतीक शिवशरण हा बालक शाळेतून घरी येऊन जेवण करून मित्राबरोबर फिरावयास गेला असता तो घरी परतलाच नाही. त्याच्या आई- वडिलांनी तपास घेतला असता त्याचा मृतदेह उसाच्या फडात पाच दिवसांनंतर आढळून आला. पोलीस तपासात त्याचा मृत्यू नरबळी झाल्याचा संशय व्यक्त करून आरोपी पकडण्यास विलंब होत असल्याप्रकरणी नागपूर- रत्नागिरी महामार्गावर माचणूर येथे ग्रामस्थांच्यावतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
जनहित शेतकरी संघटनेने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन केले. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणात मुळाशी जाऊन नानासाहेब डोके व त्यांच्या इतर साथीदारांना ताब्यात घेण्यात आले. तपासात त्यांनी प्रतीकची नरबळी प्रकरणातून हत्या केल्याची कबुली दिली. ते सध्या न्यायालयीन कोठडीत होते. गेले काही दिवस सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पुढील उपचारासाठी त्यांना पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचारादरम्यान त्यांचा पुणे येथे बुधवारी रात्री मृत्यू झाला. गुरुवारी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा त्यांच्या मृतदेहावर माचणूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
* अपघातात झेडपीतील अधिकारी ठार
सोलापूर : पुणे महामार्गावरील बाळे पुलाजवळ नेक्सा शोरूमसमोर अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकींवरील अनिल हरिदास पवार (वय ४२, रा. बीबी दारफळ, ता. उत्तर सोलापूर) हे जिल्हा परिषदेतील अधिकारी गंभीर जखमी होऊन मरण पावले. हा अपघात बुधवारी रात्री घडला.
पवार हे जिल्हा परिषदेतील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात काम पाहत होते. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास ते आपल्या दुचाकीवरून घराकडे निघाले होते. बाळे पुलाच्या अलीकडे अज्ञात वाहनाच्या धडकेने ते गंभीर होऊन जागीच मयत झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार गुलचंद पवार यांचे ते चुलत बंधू होते. या अपघाताची नोंद फौजदार चावडी पोलिसात झाली. हवालदार कसबे पुढील तपास करीत आहेत.