सोलापूर : सोलापूर- अक्कलकोट रस्त्यावरील वळसंग टोल नाक्यावर पाेलिस कर्मचा-याने टाेल का मागितला अशी विचारणा करीत टाेल कर्मचा-यास मारहाण केली. या प्रकरणी टाेल नाका व्यवस्थापनाच्या तक्रारी नुसार पाेलिस कर्मचा-यासह आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना काल शनिवारी दुपारी वळसंग टाेल नाका येथे घडली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तसेच वादविवादाचे दृश्य देखील सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.
टाेल नाका वळसंग टोल प्लाझाचे व्यवस्थापक संताेष कुलकर्णी यांच्या तक्रारीनुसार सोलापूर पोलिस आयुक्तालयातील कार्यरत पोलिस कर्मचारी बापू वाडेकर आणि अनोळखी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे
* मानसिक आजारातून गळफास,चाकणचा रुग्ण सोलापुरात दाखल
सोलापूर : मानसिक आजारातून बसवेश्वर परमेश्वर हुल्ले (वय ४२ मुळ रा. दहिटणे ता. अक्कलकोट) याने चाकण ( जि. पुणे) येथील घरात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला चाकण येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात बेशुद्धावस्थेत काल शनिवारी दाखल करण्यात आले.
बसवेश्वर हुल्ले याने २९ सप्टेंबर च्या पहाटे चाकण येथील घरात छताच्या लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेतला होता. त्याला फासातून सोडवून चाकण येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला सोलापुरात दाखल करण्यात आले. अशी नोंद सिव्हिल पोलिसात झाली आहे.
* येळेगाव येथे दुचाकी चालक ठार; ट्रक चालकावर गुन्हा
सोलापूर : येळेगाव ते कंदलगाव (ता. दक्षिण सोलापूर) या रस्त्यावर ट्रकच्या धडकेने दुचाकीवरील वीरप्पा खंडप्पा राऊतराव (वय४६ रा. कंदलगाव ता. दक्षिण सोलापूर) हे गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाले.
हा अपघात शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडला. या प्रकरणात मंद्रूप पोलिसांनी टीएन ५२- एम-६९७१ या ट्रकचा चालक कुमार प्यारालिंगम (वय४५रा. सेलम, तामिळनाडू) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सहाय्यक फौजदार पवार पुढील तपास करीत आहेत.
* दुचाकीवरील ४० हजाराच रोकड लंपास
झरे ते पोफळज (ता. करमाळा) या रस्त्यावर दुचाकी थांबवून लघुशंकेसाठी गेले असताना चोरट्याने दुचाकीवरील ४० हजाराची रोकड असलेली पिशवी पळवली. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. रितेश शंकर खंदारे (रा. करमाळा) हे तालुका परिसरातील बचत गटाचे पैसे जमा करून करमाळा येथे निघाले होते. रस्त्यात वाहन उभे करून ते लघुशंकेसाठी गेले होते. त्यावेळी हा प्रकार घडला. करमाळा पोलिसात याची नोंद झाली. हवालदार खंडागळे पुढील तपास करीत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* उपाशी ठेवून विवाहितेचा छळ ; पतीसह चौघांवर गुन्हा
सोलापूर : विवाहितेला उपाशी ठेवून तिचा छळ करून व नवऱ्याला सोडून दे नाहीतर एक लाख रुपये घेऊन ये अशी दमदाटी केल्याची घटना २०१८ ते ३० सप्टेंबर २०२१ दरम्यान न्यू रंगराज नगर जुना विडी घरकुल सोलापूर येथे घडली. याप्रकरणी अश्विनी रवी चव्हाण (वय- २८,रा. न्यू रंगराज नगर जुना विडी घरकुल सोलापूर यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून वि शंकर चव्हाण विमलाबाई शंकर चव्हाण शंकर चव्हाण (सर्व. रा. न्यू रंगराज नगर, जुना विडी घरकुल,सोलापूर) व रचना भारत पवार (रा.पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,वरील संशयित आरोपींनी संगणमत करून फिर्यादी अश्विनी चव्हाण यांना वेळोवेळी उपाशी ठेवून शिवीगाळ करत मारहाण केली.त्यानंतर अश्विनी यांना माहेरुन एक लाख रुपये घेऊन ये तेव्हा तुला नांदवतो असे म्हणाले.संशयित आरोपी अर्चना पवार हिने अश्विनी चव्हाण यांना तुला पटत नसेल तर नवऱ्याला सोडून दे नाहीतर एक लाख रुपये घेऊन ये असे म्हणाली व पुन्हा दिसली तर याद राख असे बोलून दमदाटी केली.असे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक मुजावर हे करीत आहेत.
* दुकान फोडून तीस हजारांचा ऐवज लंपास
सोलापूर : कुणीतरी अज्ञात चोरट्याने तुळजाई भोसले नगर हैदराबाद रोड सोलापूर येथील सिफा बेकरीचे दुकान फोडून तीस हजार सहाशे रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना दि.१ ते २ ऑक्टोंबर २०२१ दरम्यान घडली.याप्रकरणी इस्माईल गुलाब बागवान (वय-३०,रा.तुळजाई भोसले नगर,हैदराबाद रोड,सोलापूर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी इस्माईल बागवान यांच्या बेकरीच्या दुकानाचे कुलूप तोडून दुकाना मधून साहित्य व रोख रक्कम असा एकूण तीस हजार सहाशे रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक काळेल हे करीत आहेत.