बार्शी : वैद्यकीय प्रवेशासाठी गेल्या 12 सप्टेंबरला झालेल्या नीट परिक्षेत प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेतील विसंगतीमुळे सहा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका देताना चूक झाल्याचे पर्यवेक्षक आणि केंद्र संचालकांनी कबूल केले आहे. त्यावर जिल्हाधिकार्यांनीही नीटला अहवाल सादर केला आहे. मात्र निकालाची तारीख जवळ आली तरी नीटकडून अद्याप फेरपरिक्षेचा निर्णय घेतला गेला नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
राज्यात नागपूर येथे नीट परिक्षेदरम्यान गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर कुंभारी येथे झालेल्या या प्रकाराची उच्चस्तरावर सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. तालुक्यातील धामणगाव येथील अभिषेक शिवाजी कापसे, वैष्णवी विजय भोपळे, नेहा अखलाक शेख, प्राजक्ता गणेश थोरात, आदिती रणजीत पोतदार, मृदुला नागनाथ लोंढे या सहा विद्यार्थ्यांना नीट परिक्षेसाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल येथील परिक्षा केंद्र देण्यात आले होते. त्यांच्या 10 क्रमांकाच्या परिक्षा हॉलवर राजश्री लामकाने व प्रणाली पवार या पर्यवेक्षक होत्या.
त्यांनी परिक्षेची वेळ झाल्यानंतर त्यांना सीलबंद पाकिट न देता पाकिट फोडून प्रथम उत्तरपत्रिका दिल्या आणि नंतर प्रश्नपत्रिका दिल्या. या विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका सोडविण्यास घेतल्यानंतर त्यांना आपल्याला दिलेल्या उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिकांचा कोड वेगवेगळा असल्याचे निदर्शनास आले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यामुळे त्यांनी लागलीच हा प्रकार पर्यवेक्षिकांच्या कानावर घातला. मात्र त्यांनी आपलंच बरोबर आहे असे म्हणून त्यांना धुडकावून लावलं, त्यांनी वारंवार चूक सुधारण्याची विनंती केली असता त्यांनी वेळ मारुन नेली. त्यानंतर पर्यवेक्षिकांनी केंद्र संचालकांना कळविले मात्र त्यांनीही दखल घेतली नाही. त्यामुळे विद्यार्थी हतबल झाले. यातच परीक्षेची वेळ संपली.
त्यानंतर या विद्यार्थ्यांनी लागलीच जिल्हाधिकार्यांना लेखी पत्राव्दारे घडलेली बाब कळविली. त्यांनी संबंधित केंद्र संचालक संतोष भालकी आणि पर्यवेक्षिकाकडून अहवाल मागविला असता त्यांनी आपली चूक कबूल केली तसेच परिक्षा केंद्रावर गोंधळ होवू नये म्हणून चूक लक्षात आल्यानंतरही ती दुरुस्त न केल्याचे संतापजनक स्पष्टीकरण दिले आणि क्षमायाचना केली.
जिल्हाधिकार्यांनी त्यावर नीटच्या महासंचालकांकडे आपला अहवाल सादर केला. अशाप्रकारे परिक्षा यंत्रणेने धडधडीत रित्या आपली चूक कबूल करुन सुध्दा अद्यापपर्यंत या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. या विद्यार्थ्यांनी संबंधित पर्यवेक्षिका व केंद्र संचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याचीही दखल घेतली गेली नाही.