लखनौ : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी इथे शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसाचारादरम्यान 5 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. दोन लोकांचा मृत्यू गाडीने उडवल्यामुळे तर तीन लोकांचा मृत्यू गाडी उलटल्यामुळे झाला असल्याचं लखीमपूरचे जिल्हाधिकारी डॉ. अरविंद चौरसिया यांनी सांगितलं.
जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे या भागात आले होते. अजय मिश्रा यांच्या टेनी गावातील कार्यक्रमासाठी त्यांना जायचं होतं.
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या गाड्यांचा ताफा आंदोलनस्थळी आला.
दोन लोकांचा मृत्यू गाडीने उडवल्यामुळे तर तीन लोकांचा मृत्यू गाडी उलटल्यामुळे झाला असल्याचं लखीमपूरचे जिल्हाधिकारी डॉ. अरविंद चौरसिया यांनी सांगितलं.गेल्या वर्षी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांना विरोध म्हणून हजारो शेतकरी काळे झेंडे घेऊन तिकुनिया जिल्ह्यातील लखीमपूर खिरी इथे जमले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ताफ्यातील काही गाड्या आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर घालण्यात आल्याचं शेतकरी संघटनांचं म्हणणं आहे. यामध्ये एकूण 5 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले आहेत. गाड्यांचा ताफा सुरळीतपणे मार्गस्थ व्हावा यासाठी शेतकरी आंदोलकांना रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभं राहण्यास सांगण्यात आलं होतं. किसान मोर्चाने जारी केलेल्या पत्रकानुसार, या घटनेत दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर संघटनेचे नेते ताजिंदर सिंग विर्क गंभीररीत्या दुखापतग्रस्त झाले आहेत.
या घटनेनंतर परिसरात वातावरण तापलं आणि वाहनांना आग लावल्याचे प्रकार झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तिकोनियात भाजप समर्थकाच्या गाडीने काही शेतकरी जखमी झाले. यानंतर भडकलेल्या शेतकरी आंदोलकांनी गाड्यांना आग लावल्याचे वृत्त आहे.
स्थिती तणावपूर्ण झाल्याने उपमुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम थांबवण्यात आला. परिस्थिती लक्षात घेऊन, प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, “कृषी कायद्यांचा शांततापूर्ण निषेध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर केंद्रीय गृहराज्यमंत्राच्या गाड्यांचा ताफा घालणं अमानुष आणि क्रूर आहे. उत्तर प्रदेशातील दांभिक भाजपाचा जुलूम आता सहन केला जाणार नाही. असंच सुरू राहिलं तर उत्तर प्रदेशात भाजप नेते गाडीने फिरू शकणार नाहीत, आणि त्यातून उतरूही शकणार नाहीत”.
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनीही याघटनेसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. “भाजप देशातील शेतकऱ्यांचा एवढा द्वेष का करतं? त्यांना जगण्याचा हक्क नाहीये का? त्यांनी एखाद्या गोष्टीविरोधात आवाज उठवला तर त्यांना गोळी मारली जाते, गाड्या अंगावर घातल्या जातात. खूप झालं. हा शेतकऱ्यांचा देश आहे. भाजपच्या क्रूर विचारधारेची जहागीर नाही”, असं प्रियांका गांधी यांनी म्हटलं आहे. “हा अमानवीय नरसंहार पाहूनही जे गप्प आहेत ते आधीच मृत झाले आहेत. पण आम्ही हे बलिदान वाया जाऊ देणार नाही. शेतकरी सत्याग्रह जिंदाबाद”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.