सोलापूर – अक्कलकोट येथील बायपास रोडवर मोटारीच्या धडकेने दुचाकीवरील शिवलिंग अप्पा यशवंतराव पाटील (वय ४५ रा. सलगर ता. अक्कलकोट) हे शेतकरी गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मयत झाले. हा अपघात आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडला.
मयत शिवलिंगअप्पा हे अक्कलकोट येथे काम आटोपून आपल्या दुचाकीवरून गावाकडे निघाले होते.दुपारी ३ वाजेच्या सुमारास सोलापूरहून गाणगापूरच्या दिशेने जाणारी एम एच१२- क्यूवाय-९५७८ या क्रमांकाचे मोटार समोरून धडकल्याने ते गंभीर जखमी झाले.
त्यांना विजयकुमार बिराजदार (नातेवाईक) यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ते उपचारापूर्वीच मयत झाले. मयत पाटील यांच्या पश्चात पत्नी २ मुले आणि १ मुलगी असा परिवार आहे. या अपघाताची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे .
* मिल्लत नगर येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
सोलापूर – विजापूर नाका परिसरातील मिल्लत नगर येथे राहणाऱ्या रफीक इलाही पिरजादे (वय २७) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह छताच्या लाकडी वाशाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्याला फासातून सोडवून भावाने शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तो उपचारापूर्वीच मयत झाला. मयत रफिक हा मजुरीचे काम करीत असून तो अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई-वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिस झाली असून या मागचे कारण समजले नाही. हवालदार घुगे पुढील तपास करीत आहेत.
* मेडिकल स्टोअर्समधून साडेपाच लाखाची चोरी
सोलापूर – अकलूज येथील अभय मेडिकल स्टोअर्स या दुकानातून साडेपाच लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना ३० सप्टेंबर च्या पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणात अकलूजच्या पोलिसांनी दुकानातील संशयीत म्हणून १२ कामगाराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात दुकानाचे चालक मनोहर कालिदास इनामदार (वय ६९ रा.संग्रामनगर) यांनी अकलूज पोलिसात फिर्याद दाखल केली.त्याप्रमाणे पोलिसांनी सुशांत माने (रा. उघडेवाडी) रोहन कदम, महेश कुलकर्णी, महादेव भंडारे, निलेश गिरमे, सविता मुधळे, मधुकर मैंदाळ, प्रज्योत पंचवाघ (सर्व रा. संग्रामनगर) दयानंद रेणके, सोन्या गोरे, सायली कुलकर्णी ( सर्व रा. अकलूज) प्रविण जगताप (रा.माळीनगर) आणि सायली कुलकर्णी अशा संशयित बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
आपल्या औषध दुकानाच्या खोलीमध्ये ठेवलेली ५ लाख ५० हजार ९०० रुपयाची रोकड असलेली पिशवी २९ सप्टेंबरच्या रात्री ते दुसर्या दिवशीच्या सकाळी चोरीस गेली. ती रक्कम दुकानात काम करणाऱ्यांनी चोरून नेली असावी, अशा आशयाची फिर्याद मनोहर इनामदार यांनी पोलिसात दिली. सहाय्यक निरीक्षक मारकड हे पुढील तपास करीत आहे .