मुंबई : ड्रग्स प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबईतल्या ऑर्थर रोड जेलमध्ये नेण्यात आले आहे. कोर्टाने गुरुवारी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यातच आज आर्यनच्या जामीनावर कोर्टात सुनावणी सुरू आहे. मात्र सुनावणी पूर्ण होण्याआधीच आर्यनची ऑर्थर रोड जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
आर्यन खानसह इतर सात आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे शाहरुख खानला मोठा धक्का बसला आहे. मात्र आर्यनच्या जामिनावर पुढील सुनावणी आज होणार होती. त्यानुसार आर्यनची रवानगी तुरुंगात झाली आहे. कोर्टात आर्यन खान तसेच एनसीबीच्या वकिलांची खडाजंगी झाली. आर्यन खानच्या बाजूने अॅड. सतीश मानेशिंदे यांनी बाजू मांडली. तर एनसीबीच्या बाजूने एएसजी अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला. आर्यन खान, इतर सात आरोपी तसेच एनसीबीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आज निकाल दिला आहे.
मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये आर्यन खानसह इतर सात जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या एनसीबीकडून सुरु आहे. एनसीबीने आर्यन खानसह अरबाझ मर्चंट (आर्यनचा मित्र), मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा यांना अटक केली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या सर्वांची एनसीबी कोठडीचा कालावधी संपल्यामुळे त्यांना कोर्टात हजर केलं होतं. यावेळी एएसजी अनिल सिंग यांनी एनसीबीची बाजू मांडली. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींचा एकमेकांशी संबंध आहे. ड्रग्ज तस्करीचे जाळे शोधण्यासाठी त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची गरज आहे. सर्व आरोपींची येत्या 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडी वाढवावी, अशी विनंती न्यायालयाकडे केली. त्यानुसार 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
आर्यनच्या वकिलाने आर्यन खान यांच्या कोठडीत वाढ करण्याची गरज नसल्याचे म्हणत आर्यनला जामीन मंजूर करण्यात यावा, अशी न्यायालयाला विनंती केली. या सुनावणीदरम्यान एनसीबीचे वकील तसेच आर्यन खान आणि इतर आरोपीची बाजू मांडणारे वकील यांच्यात खडाजंगी झाली. दोन्ही बाजू ऐकूण घेतल्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, आर्यनचे वकील जामीनासाठी सत्र न्यायालयात जाणार असल्याचे वृत्त आहे. काल कोरोनामुळे आर्यनसह इतर आरोपींना एक रात्र तुरुंगाऐवजी एनसीबी कार्यालयात ठेवले होते. आज त्यांना जे जे रुग्णालयात तपासणी करून आर्थर रोड कारागृहात पाठवण्यात आल. तर मुनमुन आणि नुपूर यांना भायखळा महिला कारागृहात पाठवण्यात आलं आहे. आर्यनसह इतर आरोपीना 3 ते 4 दिवस क्वारंटाईन सेलमध्ये ठेवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.