तुळजापूर : तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेचे मंदिर भाविकांसाठी खुलं झालं आहे. कोरोनासंबंधीचे सर्व नियम पाळणे भाविकांसाठी बंधनकारक आहे. नवरात्रीच्या काळात मंदिरात कोणत्याही प्रकारची पूजाविधी करता येणार नाही, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. मात्र हा नियम मोडत मंदिरात अर्धा तास पूजा विधी केल्याने भाजपचे आचार्य तुषार भोसले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांच्यासह इतरांवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. कोरोना नियमांचे आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने कलम 109,188 व 269 अनन्वे हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सामान्य भक्तांच्या आधी अनधिकृतपणे तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करून दर्शन घेऊन विनामास्क फोटो काढून व्हायरल करणे तुषार भोसलेंच्या चांगलेच अंगलट आले आहे.
पास न काढताच भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी काल सहपरिवार घेतले तुळजाभवानीचे दर्शन घेतले होते. दुपारी 12 नंतर घटस्थापनानंतर भाविक यांना मंदिरात सांयकाळी 6 नंतर प्रवेश असल्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आदेश काढले होते मात्र त्यापूर्वीच भोसले यांनी प्रवेश करून दर्शन घेतले. तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात व मंदिर परिसरात भोसले यांनी विनामास्क फोटो सेशन केले हे त्यांना चांगलेच अंगलट आले आहे.
तुळजाभवानीसह राज्यातील मंदिरे खुली करावी यासाठी भोसले यांनी तुळजाभवानी मंदिर समोर आध्यत्मिक आघाडीच्या वतीने आंदोलन केले होते. मंदिर खुले झाल्यानंतर तुळजाभवानी दर्शन घेऊन आनंदोत्सव साजरा करण्याची घोषणा भोसले यांनी केली होती, मात्र दुपारी 12 वाजता घटस्थापनानंतर सायंंकाळी 6 वाजता भाविकांना दर्शन देण्याचे आदेश होते. दर्शनासाठी 15 हजार भाविकांची मर्यादा होती. त्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफ लाइन पास काढणे गरजेचे होते. मात्र तुषार भोसले यांनी नियम फाट्यावर मारत सामान्य भक्तांच्या आधी प्रवेश करून दर्शन घेतले होते. यावर सोशलमीडियावर चांगलीच चर्चा झडली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भोसले यांच्या या कृत्याबद्दल प्रसार माध्यमातून मंदिर संस्थानच्या कार्यपद्धतीवर टीका झाल्यानंतर जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी उपविभागीय अधिकारी डॉ योगेश खरमाटे यांना तात्काळ चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार मंदिराचे सहायक व्यवस्थापक प्रवीण अमृतराव यांच्या तक्रारीवरून भोसले यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, याचा तपास पोलिस निरीक्षक आजीनाथ काशीद यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस कॉन्स्टेबल विजयकुमार राठोड हे करीत आहेत.
भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी घटस्थापनेच्या मुहुर्तावर सहपरिवार तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. जुलमी ठाकरे सरकारचे देवीने मर्दन करावे व महाराष्ट्रमध्ये राम राज्याची स्थापना करावी असे साकडे त्यांनी घातले. अधर्मी ठाकरे सरकारने गेल्या 6 महिन्यांपासून देवी देवतांना कुलूपबंद केले होते, त्यांची आता सुटका झाली आहे. घटस्थापना हा आनंदच दिवस आहे , लाखो लोकांची चूल पेटणार आहे. अतिवृष्टीमुळे झालेले सावट कमी होऊ दे शेतकरीला बळ दे असे साकडे तुषार भोसले यांनी देवीसमोर घातले.
* कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात तणाव
कोल्हापूर : नवरात्रौत्सवाला कालपासून सुरुवात झाली आहे. तसेच राज्यातील मंदिरंही कालपासून उघडण्यात आली आहे. अशावेळी काल कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला होता. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. त्याचा तणाव आजही जाणवत आहे.
कोल्हापूर पोलिसांसह बॉम्बशोधक पथक मंदिरात दाखल झाले होते. त्यांच्याकडून मंदिराचा कानाकोपऱ्यात शोध घेण्यात आला. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण मंदिर परिसर रिकामा केला होता. मात्र, बॉम्बशोधक पथकानं संपूर्ण मंदिर परिसरात पाहणी केल्यानंतर अशी कुठलीही वस्तू किंवा पदार्थ मिळून आली नाही.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला होता. पणजी (गोवा) कंट्रोल रुमला हा फोन आला होता. या फोनमुळे मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली होती. फोनवरुन ही माहिती मिळताच मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी मंदिर तात्काळ बंद केलं.