मुंबई : मुंबईतल्या क्रूझवरील पार्टीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार होते का? असा प्रश्न एनसीबीला आज विचारण्यात आला. त्यावर तुम्ही जी नावे विचारत आहात त्यावर एकच सांगू शकेल की प्रकरणाचा तपास सुरु आहे तर नावे सांगणे योग्य ठरणार नाही. आम्ही फार जबाबदार संस्थेसाठी काम करतो. आम्ही असे कोणतेही वक्तव्य करु शकणार नाही,’ असे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी म्हटले.
मुंबईतील क्रूझवरील पार्टी प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मोठा गौप्यस्फोट केला आहे. एनसीबीने कारवाई दरम्यान काही लोकांना सोडून दिले, त्यामध्ये राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याच्या मुलाच्या अतिशय जवळचा माणूसही होता, तो क्लीन होता, असे फडणवीस यांनी म्हटले. याआधी भाजपच्या नेत्याच्या जवळच्या व्यक्तींना सोडून देण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुंबईतील क्रूझवरील ड्रग्स प्रकरणात अटक केल्यानंतर आर्यन खानसोबत एका व्यक्तीचा सेल्फी व्हायरल झाला. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी या व्यक्तीचे नाव के. पी. गोसावी असून तो प्रायव्हेट डिटेक्टिव्ह असल्याचा दावा केला आहे. के. पी. गोसावी हा एनसीबीचा साक्षीदार आहे. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्त यांनी दिलेल्या माहितीनुसार गोसावी पुण्यातील फसवणुकीच्या प्रकरणात आरोपी आहे.
क्रुझवरील ड्रग्स पार्टीतून पकडलेल्यांमध्ये भाजपच्या नेत्यांच्या नातलगांचा समावेळ होता. मात्र त्यांना सोडून देण्यात आलं, असा आरोप मलिक यांनी केलाय. या पार्श्वभूमीवर एनसीबीकडूनही पत्रकार परिषद घेण्यात आली. तेव्हा पत्रकारांनी या ड्रग्स पार्टीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार होते का? असा सवाल विचारला. त्यावेळी एनसीबी अधिकाऱ्यांकडून नावं जाहीर करण्यास नकार देण्यात आला.
सर्व ऑपरेशन हे वास्तविक वेगवेगळ्या आधारावर असते. त्यामुळे पुरावे गोळा करणं कठीण असतं. एकूण नऊ साक्षीदार या प्रक्रियेत सहभागी झाले. त्यामध्ये मनिष भानुशाली आणि के पी गोसावी हे देखील होते. या सर्व साक्षीदारांना दोन तारखेच्या ऑपरेशन आधी एनसीबी ओळखत नव्हती. या ऑपरेशन दरम्यान ज्या लोकांना अटक करण्यात आलं होतं त्यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर त्यांना एनसीबी कार्यालयात आणलं गेलं, असंही एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
कोठडीत असताना आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारावर आणखी 6 ठिकाणी आम्ही कारवाई केली आहे. हे एक मोठं नेटवर्क आहे. हे आपल्या तरुणांना बरबाद करत आहेत. आमची कारवाई सुरूच राहणार, अशी प्रतिक्रिया एनसीबीचे अधिकारी ज्ञानेश्वर सिंग यांनी दिली.