मोहोळ : शेतामध्ये नांगरट करत असताना विजेचा कडकडाट ढगांचा गडगडाटासह जोराचा पाऊस सुरू झाला आणि अंगावर वीज पडल्याने एकाचा मृत्यू झाला. ही घटना आज शनिवारी दुपारी घटना तांबोळे शिवारात घडली.
बाळू गोविंद सरवदे ( ५१, रा नजीक ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तांबोळे शिवारात गट नंबर ७८ / ३ या ठिकाणी शेतामध्ये बाळू गोविंद सरवदे व प्रकाश गोविंद सरवदे हे दोघे बैलजोडी सह नांगरट करत होते. अचानक पावसाला सुरुवात झाली बारीक पाऊस सुरू झाल्याने गडबडीमध्ये गवत गोळा करू लागले. त्यामुळे त्यावेळी विजेचा मोठा कडकडाट झाला.
शेतातील बैलजोडी नांगरासकट पळत सुटली व बाळू व प्रकाश दोघेही खाली पडलेले होते. त्याचे पुतणे त्यांना पडलेले पाहून पळत जावून त्यांना उठवू लागले. यावेळी प्रकाश सरवदे यांच्या डोळ्यांना अंधारी आली होती, तर बाळू गोविंद सरवदे ( वय ५१) हे बेशुद्ध अवस्थेत पडले होते. त्यांना उचलून मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी ते मयत झाल्याचे घोषित केले.
कोन्हेरी (ता मोहोळ ) येथे धनाजी मुळे यांची म्हैस विज अंगावर पडल्याने मयत झाली. यापूर्वी सहा दिवसापूर्वी कोन्हेरी येथीलच प्रकाश बाबु तुपसमींदर या शेतकऱ्याची जर्सी गाई विज पडून मयत झाली होती.आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* नीट परिक्षेचा निकाल जाहीर करु नका, उच्च न्यायालयाचा आदेश
बार्शी : याचिकाकर्त्यांचा नीट परिक्षेचा निकाल पुढील तारखेपर्यंत जाहीर करु नये, असे आदेश उच्च न्यायालयाच्या व्दिसदस्यीय पीठाने प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकातील विसंगतीप्रकरणी दाखल याचिकेच्या सुनावणीप्रसंगी दिला.
यावेळी तक्रारबाधित परिक्षेच्या केंद्र संचालकाकडून प्रतिज्ञापत्राव्दारे प्राप्त होणार्या अहवालावर निर्णय घेवू, अशी हमी नीटच्यावतीने देण्यात आली. त्यामुळे न्यायालयाने येत्या सोमवारी दहा वाजेपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करा, असे आदेश केंद्र संचालकांना दिले. यावर ११ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड. पूजा थोरात, ऍड. गजानन कुकडे, ऍड. एच.एस. शिंदे यांनी काम पाहिले. गेल्या 12 सप्टेंबर रोजी झालेल्या नीट परिक्षेदरम्यान दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील स्वामीनारायण गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल या परिक्षा केंद्रातील दहा क्रमांकाच्या कक्षामध्ये सहा विद्यार्थ्यांना विसंगत कोडच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका दिल्या गेल्या होत्या.
याबाबत परिक्षार्थ्यांनी वेळीच पर्यवेक्षक आणि केंद्र संचालक यांना त्यांच्याकडून झालेली चूक निदर्शनास आणून देवून देखील त्यांनी त्याची दुरुस्ती केली नाही. त्यामुळे आपले शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून बार्शी तालुक्यातील धामणगाव येथील अभिषेक कापसे आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील हगलूर येथील वैष्णवी भोपले यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्याची सुनावणी न्यायमूर्ती आर.डी. धनुका आणि अभय आहुजा यांच्या व्दिसदस्यीय पीठासमोर झाली.