बार्शी : महिलेचा छळ हा सर्वसामान्य घरात, अशिक्षित घरामध्येच होतो असा नाही, तर उच्च शिक्षित, उच्च पेशा असणा-या घरामध्येही होत आहे. हे सर्व पैशाच्या हव्यासापोटी होत असल्याचे दिसून येत आहे. 50 लाख रुपये देवूनही पैशासाठी डॉक्टरपत्नीचा छळ करणार्या डॉक्टरपती विरोधात बार्शीत गुन्हा दाखल झाला आहे.
विविध कारणाने वारंवार होणार्या पैशाच्या मागण्या पुर्ण करुन सुमारे 50 लाख रुपये दिले तरी डॉक्टर पत्नीचा छळ करणारा डॉक्टर पती आनंद जालींदर पांढरे व सासू शारदा जालींदर पांढरे (रा. ए/338 कर्निक नगर, सोलापूर हल्ली रा. सरस्वती बिल्डींग नं.9 फ्लॅट नं.304 सेक्टर 19 श्री रामकृष्ण कर्णमहाराज रोड नेरूळ ईस्ट नवी मुंबई ) यांच्याविरोधात सौ. चैताली आनंद पांढरे (रा. सरस्वती बिल्डींग नं.9 फ्लॅट नं.304 सेक्टर 19 श्री रामकृष्ण कर्णमहाराज रोड, नेरूळ ईस्ट, नवी मुंबई हल्ली सृजन बंगला, नाईकवाडी प्लॉट, उपळाई रस्ता, बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मूळच्या बार्शी येथील असलेल्या चैताली चंद्रकांत मोरे यांचा आनंद पांढरे याच्याशी 10 वर्षापूर्वी विवाह झालेला आहे. लग्नात सोने व रोख रक्कम अशी 25 लाख रुपये वरदक्षिणा दिली होती. तरीदेखील सोलापूर येथे जागा घेण्यासाठी 8 लाख रुपयांची मागणी करुन छळ सुरु केला. मुलीच्या सुखासाठी डॉ. मोरे यांनी पैसे दिले.
त्यानंतर उच्चशिक्षण घेण्यासाठी 25 लाख रुपयांची मागणी केली. डॉ. मोरे यांनी जावयाला ऍडमिशन घेवून देवून शिक्षणाचा सर्व खर्च केला. डॉ. पांढरे एकटेच मुंबईला गेले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पत्नीला त्यांनी आईच्या सेवेसाठी सोलापूर येथे ठेवले. आपले वैद्यकीय शिक्षण सांभाळून त्यांनी सासूची सेवा केली. मात्र त्या घरातील कामे नीट करत नाही, म्हणून सतत त्यांना छळत होत्या. काही महिन्यानंतर वारंवार विनंती करुन मुंबईला गेल्या, मात्र तु मुंबईला का आलीस? म्हणून पतीने सतत शिवीगाळ व मारहाण सुरु केली.
विवाहितेचा काही दोष नसतानाही अपत्यप्राप्ती होत नाही म्हणूनही छळ केला. उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बार्शी येथे वैद्यकीय व्यवसाय सुरु करण्यासाठी जागा घेण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी केली. डॉ. मोरे यांनी तीही पूर्ण केली. त्यानंतर बार्शी येथे व्यवसाय करण्याचा निर्णय बदलून मुंबईला गेले. तेथे घरकामावरुन त्रास सुरु केला. त्यानंतर परत सोलापूरला आल्यानंतर त्यांना घरातून हाकलून दिले. त्या बार्शी येथे माहेरी आल्या.
मावस बहिणीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला पती नको म्हणत असताना गेली म्हणुन पतीने माहेरी बार्शी येथे येवुन आई, वडील, भाऊ यांच्या समक्ष बेल्टने मारहाण केली. त्यानंतर डॉ. मोरे यांच्या उपळाई रस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी असलेली जागा आपल्या नावावर करावी, अशी मागणी करुन त्रास सुरु केला. त्यास नकार दिल्यानंतर चैताली यांना माहेरी आणून सोडले.
आत्महत्या केली तर त्यास आनंद पांढरे त्याची आई शारदा पांढरे जबाबदार नाहीत. सख्खा व चुलत भावाने त्याला मानसिक व आर्थिक त्रास दिला, असे जबदरस्तीने लिहून घेवुन मारहाण करून पुन्हा घरातून हाकलून दिले. त्यानंतर मोरे कुटुंबियांनी चैतालीने नांदावयास जावे म्हणून बरेच प्रयत्न केले परंतु ते विफल झाल्यामुळे शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.