सोलापूर : जिल्ह्यातील एचआयव्ही बाधितांचे पुनर्वसन व्हावे, त्यांना कोणत्याही दाखल्यासाठी सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी एक खिडकी योजना उपक्रम राबविण्यात येत आहे. हा राज्यातील पहिलाच उपक्रम असेल. एचआयव्ही बाधितांच्या अडचणी सोडवण्यासाठी तहसीलदार दर्जाच्या नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे दिली.
छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयात रूग्णालय आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, वाय.आर. गायतोंडे सेंटर फॉर एड्स रिसर्च ॲन्ड एज्युकेशन, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्यावतीने आयोजित एक खिडकी योजना उद्घाटन आणि एचआयव्ही बाधित बालकांना पोषण आहार वाटप कार्यक्रमात जिल्हाधिकारी शंभरकर बोलत होते. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, वायआरजीचे व्यवस्थापक वासुदेवन, औषध विभागप्रमुख डॉ. विठ्ठल धडके, डॉ. श्रीमती जयस्वाल, डॉ. अग्रजा वरेरकर आदींसह रूग्ण उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, एचआयव्ही बाधितांना आता दाखल्यासाठी हेलपाटे मारावे लागणार नाहीत. एक खिडकी योजनेतून त्यांना सर्व प्रकारचे दाखले मिळण्यास मदत होणार आहे. केवळ त्यांनी आपली कागदपत्रे जमा करावीत. सामाजिक संस्था आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाद्वारे दाखल्याची प्रक्रिया पार पाडली जाईल. जिल्ह्यातील सर्व गरोदर मातांनी एचआयव्हीची चाचणी करून घ्यावी. पॉजिटिव्ह असाल तर घाबरून न जाता उपचार करून घ्यावेत. नियमित औषधोपचार आणि योग्य आहार घेतल्यास रूग्णांना काहीच त्रास होत नाही. अधिकाऱ्यांनी एचआयव्हीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. एक खिडकी योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
डॉ. ढेले म्हणाले, एक खिडकी योजनेतून एकाच ठिकाणी सर्व सुविधा, कागदपत्रे काढण्यासाठी मदत होणार आहे. मुलांच्या पोषण आहाराची सोय याठिकाणी करण्यात आली आहे.
डॉ. ठाकूर म्हणाले की, एचआयव्ही बाधित रूग्णांना आपुलकीची गरज आहे. त्यांची सेवा महत्वाची आहे. त्यांच्या लहान बालकांना पोषक आहाराची गरज आहे. नियमित औषधोपचार घेतल्यास एड्स नियंत्रणात राहतो.
यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी एक खिडकी योजनेचे उद्घाटन करून बालकांना पोषण आहाराच्या किटचे वाटप केले. आज 40 बालकांना पोषण आहार देण्यात आला.
जिल्हा कार्यक्रम अधिकारी भगवान भुसारी यांनी सूत्रसंचालन केले तर आभार डॉ. सुनिता गायकवाड यांनी मानले. एआरटी सेंटरच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपाली रायखेलकर यांनी कार्यक्रमाची माहिती दिली.