मुंबई : ठाकरे सरकारचे मंत्री व राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा NCB वर आरोप केलेत. NCBला ड्रग्ज आणि तंबाखूमधला फरक कळत नाही. माझे जावई समीर खान यांना NCB ने अटक करुन 8 महिने तुरुंगात ठेवले. एनसीबीच्या छाप्यात 200 किलो गांजा मिळाला नाही. माझ्या जावयाकडे हर्बल तंबाखू सापडले होते. या प्रकरणात माझ्या जावयाला फ्रेम करण्यात आल्याचेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) ही तपास संस्था बोगस कारवाया करते. कालही मी हेच म्हणत होतो आणि आजही माझं हेच मत आहे. माझ्या जावयाला व अन्य काही लोकांना एनसीबीनं ड्रग्ज तस्करीच्या खोट्या प्रकरणांमध्ये अडकवलं आहे,’ असा थेट आरोप राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज केला. हा आरोप करताना मलिक यांनी कोर्टाच्या आदेशाचाही हवाला दिला.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरण उजेडात आल्यापासून नवाब मलिक यांनी एनसीबीविरोधात आघाडीच उघडली आहे. आर्यन खानवरील कारवाईचं प्रकरण बनावट असल्याचा आरोप मलिक यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. या प्रकरणात भाजपच्या लोकांचा कसा संबंध आहे आणि एनसीबीचे अधिकारी त्यांना कसे सामील आहेत, हेही मलिक यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपले जावई समीर खान यांच्या विरोधात एनसीबीनं केलेल्या कारवाईचा तपशील मांडला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
समीर खान यांना एनसीबीनं कसं अडकवलं याचा घटनाक्रमच नवाब मलिक यांनी सांगितला. समीर खान यांना ज्या प्रकरणात गोवण्यात आलं ते प्रकरण प्रत्यक्षात शाहिस्ता फर्निचरवाला हिच्याशी संबंधित होतं. तिच्याकडून एनसीबीनं साडेसात ग्रॅम गांजा जप्त केला होता. त्या कारवाईनंतर मुंबई, दिल्ली, नोएडा, गुरगाव अशा अनेक ठिकाणी एका मागोमाग एक छापे टाकण्यात आले. माझ्या मुलीच्या घरी देखील छापा टाकण्यात आला. या सगळ्या कारवाईतून २०० किलो गांजा जप्त करण्यात आला, असं एनसीबीनं सांगितलं.
मीडियाच्या माध्यमातून या बातम्या पसरवण्यात आल्या. प्रत्यक्षात हे प्रकरण केवळ साडेसात ग्रॅम गांजाचं होतं. हा गांजा जिच्याकडून पकडण्यात आला, तिला सोडण्यात आलं. मात्र, माझा जावई समीर खान, राहिला फर्निचरवाला आणि करण सजलानी यांना अडकवण्यात आलं,’ असं मलिक यांनी सांगितलं.
जप्त केलेल्या गांजाचे व कारवाईचे फोटो एनसीबीच्या एका अधिकाऱ्याच्या मोबाइलवरून पत्रकारांना पाठवण्यात आले होते. तो मोबाइल नंबरही (९८२०१ ११४०९) मलिक यांनी माध्यमांना दिला. जप्तीची प्रक्रिया चुकीची असल्याचं कोर्टात सिद्ध झालं. कुठलीही गोष्ट जप्त केल्यानंतर ती तिथल्या तिथं सील केली जाते, मात्र माध्यमांना पाठवण्यात आलेले फोटो हे एनसीबीच्या कार्यालयातील होते, असा मुद्दा आम्ही कोर्टात उचलला. त्यावर एनसीबीकडं उत्तर नव्हतं. मीडियानं हे फोटो काढले असावेत, असं सांगण्यात आलं. त्यातून या प्रकरणात गडबड असल्याचं समोर आलं, असं मलिक म्हणाले.