मुंबई : गुरू माँ कांचन गिरीजी आणि जगतगुरू सुर्याचार्यजी यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी भेट घेतली. त्यांनी हिंदुत्व व राष्ट्र उभारणीबाबत चर्चा केली. तसंच राज ठाकरे यांना अयोध्येला येण्याचे निमंत्रणही दिले.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, आज कांचनगिरी यांनी कृष्णकुंज येथे राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर याबाबत माहिती दिलीय. तसेच अयोध्येत सर्व साधूसंत राज ठाकरे यांचं मोठं स्वागत करतील असंही नमूद केलं. कांचनगिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार राज ठाकरे डिसेंबरमध्ये अयोध्येला भेट देण्याचा विचार करत आहेत.
या भेटीत राज ठाकरे यांनी अयोध्येला येण्याची बाबतची इच्छा कांचनगिरीजी यांना बोलून दाखवली. कांचन गिरीजी यांनी राज यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यातही त्यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची माहिती दिली.
कांचनगिरी म्हणाल्या, “राज ठाकरे डिसेंबरमध्ये अयोध्येला जाण्याचा विचार करत आहेत. जे हिंदुत्वावर प्रेम करतात ते अयोद्धेशी जोडलेले आहेत. आम्ही त्याचं भव्य स्वागत करू. पूर्ण संत समाज त्यांच्यासोबत आहे. राज ठाकरे जे बोलतात ते करतात हे मला खूप आवडलं. देशाला अशाच लोकांची गरज आहे. आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील युपी-बिहारच्या लोकांनी राज ठाकरेंना पाठिंबा दिला पाहिजे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तसेच त्यांनी आता मुंबईत राहताना काळजी करण्याचं कारण नाही. राज ठाकरेंच्या मनात उत्तर भारतीयांविषयी चांगली भावना आहे.
“राज ठाकरेंचं उत्तर भारतीयांवर खूप प्रेम आहे. त्याचं म्हणणं आहे की बिहारमधील गावांमधून लोकांचं पलायन होतंय. तिथंच कंपन्या सुरू झाल्या तर लोकांना गावातच रोजगार मिळू शकतील. त्यांना घर सोडून जावं लागणार नाही. त्यांच्या याच भूमिकेला लोकांनी चुकीचं घेतलं. ते जितकं प्रेम महाराष्ट्रातील लोकांवर करतात तितकंच प्रेम उत्तर भारतीय लोकांवर करतात,” असंही कांचनगिरी यांनी नमूद केलं.
कांचनगिरी म्हणाल्या, “अफगाणिस्तानचे काय हाल झालेत हे सर्वजण पाहत आहेत. पुढील १० वर्षात भारताची स्थिती अफगाणिस्तानसारखी होऊ शकते. हिंदूस्थान त्या धोक्याच्या किनाऱ्यावर आहे. १० वर्षांनंतर हिंदूंना शरणार्थी बनावं लागेल. आज हिंदू जागे झाले नाही तर कधीच जागे होणार नाही.”
कांचनगिरी म्हणाल्या, “जुना इतिहास आहे की संतांनी राज्यांचं नेतृत्व केलंय. चंद्रगुप्त मौर्या यांचं उदाहरण पाहू शकता. त्यांना चाणाक्याने मार्ग दाखवला. त्यानंतर ते यशस्वी राजा बनले. हे संतांचं कामच आहे की राजकीय नेत्यांना मार्गदर्शन करणं.माझा राजकारणाशी संबंध नाही. जे खरे राष्ट्रवादी राजकीय नेते आहेत त्यांच्या नेतृत्वात राहू. पण सध्या पदाबाबत कोणताही विचार नाही,” असंही कांचनगिरी यांनी सांगितलं.