बार्शी : तालुक्यातील भातंबरे येथील मातब्बर नेते प्रमोद वाघमोडे एसआरपी गोरोबा महात्मेने केलेल्या गोळीबारातून बालंबाल बचावले. गोरोबाचा चुलतभाऊ बालाजी याने त्यांना धक्का देवून बाजूला ढकलल्यामुळे ते वाचले, मात्र तीच गोळी बालाजीच्या पाठीतून शिरुन छातीतून बाहेर निघाली. बालाजीवर सध्या सोलापूर येथे उपचार चालू आहेत.
या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या प्रमोद वाघमोडे यांचा जणू पुनर्जन्म झाला. गावचे नेते म्हणून ते वाद मिटविण्यासाठी गेले होते मात्र तेथे भलताच प्रसंग ओढवल्यामुळे झालेल्या अनपेक्षित गोळीबाराचा त्यांनाही जबर धक्का बसला आहे.
गेली अनेक दशके भातंबरे आणि पंचक्रोशीतील राजकारणात मोठे स्थान असलेल्या प्रमोद वाघमोडे यांना महात्मे कुटुंबात चालू असलेल्या वादाबाबत तोडगा काढण्यासाठी बुधवारी रात्री बोलविण्यात आले होते. त्यामुळे ते महात्मे याच्या वस्तीवर गेले असता तेथील वातावरण तापलेलेच होते.
त्यांनी गोरोबाची समजूत काढून सुनिताला माहेरी पाठविण्याची तयारी केली होती. तिच्या माहेरी फोन करुन गाडी करुन सुनिताला पाठवित आहे, त्यामुळे येण्याची गरज नाही म्हणूनही सांगितलं होतं. मात्र थोड्याच वेळात सुनिता हिच्या माहेरची मंडळी तिथे आली. वारंवार होणार्या भांडणामुळे ती पण वैतागलेलीच होती. काहीतरी सोक्षमोक्ष लावण्याच्या इराद्यानेच ती पण आली होती. त्यांच्या येण्यामुळे मिटत चाललेले प्रकरण पुन्हा भडकले. जोरात बोलाचाली सुरु झाल्या.
गोरोबाचा मेहुणा अमर तयारीनेच आला होता. त्याचा मित्र नितीन भोसकर ही आवाज चढवत होता. अमरची राखीव कुमकही पाठीमागे होती. धक्काबुक्की सुरु झाली आणि सासरच्या मंडळीच्या शिरजोरपणामुळे गोरोबा भडकला. त्याने मागचा पुढचा कसलाच विचार न करता आपल्यासोबत असलेले रिव्हॉल्वर काढले आणि पहिली गोळी अमरवर झाडली, मात्र नेम चुकला, गोळी भिंतीत घुसली.
गोरोबाचा रुद्रावतार पाहून सगळ्यांची पाचावर धारण बसली. प्रकरण हातघाईवर आल्याचे पाहून पळापळ सुरु झाली. गोरोबाला अडविण्यासाठी वाघमोडे पुढे सरसावले मात्र त्याचा बेभानपणा पाहून बालाजीने त्यांना बाजूला ढकलले आणि दुसरी गोळी बालाजीच्या पाठीत शिरली. तिसरी गोळी पुढे आलेल्या भोसकरच्या पोटात घुसली. त्यानंतर अमर पुढे आणि गोरोबा त्याच्या मागे असा पाठलाग सुरु झाला. चौथी गोळी झाडली मात्र पुन्हा नेम चुकला आणि पाचवी गोळी झाडताना रिव्हॉल्वर लॉक झाले. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला.
* नेमका गोळीबाराचा थरार, काय घडले होते, वाचा सविस्तर
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेण्यामुळे वारंवार होत असलेले भांडण मिटविण्यासाठी सुरु असलेल्या बैठकीत मेहुण्यासोबत आलेल्या त्याच्या मित्राच्या आक्रमकतेमुळे संतापलेल्या राखीव दलातील पोलिस दाजीने केलेल्या गोळीबारात तो मित्र जागीच ठार झाल्याची आणि त्यास वाचविण्यास आलेला दाजीचा चुलतभाऊ जखमी झाल्याची थरारक घटना तालुक्यातील भातंबरे येथे बुधवारी रात्रौ 11 च्या सुमारास घडली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अचानक झालेल्या या गोळीबाराने नुकतंच झोपीत चाललेलं भातंबरं खडबडून जागं झालं. आसपासचे लोक घटनास्थळाकडे धावले परंतू तोपर्यंत नको ते घडले होते. भांडण दुसर्याचं आणि हकनाक तिसर्याचा बळी गेला होता. नितीन बाबूराव भोसकर ( रा. सापनाई ता. कळंब जि. उस्मानाबाद) असे या गोळीबारात ठार झालेल्या मित्राचं नाव असून बालाजी महात्मे हा गोळी लागून जखमी झाला आहे.
याप्रकरणी काशिनाथ काळे याने गोरोबा याने पत्नीच्या चारित्र्याच्या संशयाचा राग मनात धरुन शासकीय रिव्हॉल्वरने गोळीबार करुन नितीन भोसकर यास ठार करुन बालाजी महात्मे यास जखमी केले. तसेच त्याच्यावर व अमर काकडे याच्यावर गोळीबार करुन त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबाबत फिर्याद दिली आहे. त्यावरुन वैराग पोलिस ठाण्यात गोरोबा तुकाराम महात्मे याच्याविरोधात खूनाचा आणि खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.
भातंबरे येथील गोरोबा महात्मे हा मुंबई येथे राज्य राखीव पोलिस दलात कार्यरत आहे. त्याने अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या संरक्षणाचे प्रशिक्षण घेतलेले आहे. त्यामुळे त्यास रिव्हॉल्वर देण्यात आलेली आहे. त्याचे सहा वर्षापूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील सापनाई येथील सुनिता हिचेबरोबर लग्न झालेले आहे. अलिकडे काही दिवसापासून पती-पत्नीत संशयावरुन सतत खटके उडत आहेत. त्यामुळे गोरोबा याने पत्नी सुनिता हिस भातंबरे येथे आपल्या मूळ गावी आपल्या कुटुंबासमवेत ठेवले होते. तरी देखील त्यांच्यातील भांडण मिटले नव्हते.
गोरोबा सुट्टीवर गावी आला होता. येताना त्याने आपले शासकीय रिव्हॉल्वर सोबत आणले होते. बुधवारी त्यांच्यातील भांडण वाढल्याने सुनिता हिने माहेरी जाण्यासाठी आपला भाऊ अमर जालिंदर काकडे यास बोलावले होते. तो आपली गाडी घेवून सोबत मित्र नितीन बाबूराव भोसकर आणि चालक काशिनाथ विश्वनाथ काळे यास घेवून आला होता.
सुनिता ही माहेरी जाण्यापूर्वी त्यांच्यातील भांडण मिटावे या हेतूने रात्री दहाच्या सुमारास उपसरपंच प्रमोद वाघमोडे यांच्या उपस्थितीत बैठक सुरु होती. बैठकीत घरातील, भावकीतील नातेवाईक उपस्थित होते. सर्वजण गोरोबा याला समजाविण्याचा प्रयत्न करत होते. मात्र गोरोबा हा सुनिता हिला माहेरी पाठविण्यावर ठाम होता. तो तिला माहेरी घेवून जावा, असे म्हणत होता.
यावेळी झालेल्या बोलाचालीत नितीन भोसकर आक्रमक होता. त्यामुळे गोरोबाचा संताप अनावर होत होता. त्याने रिव्हॉल्वर काढून नितीनवर गोळी झाडली. यावेळी त्याचा चुलतभाऊ बालाजी हा त्यास वाचविण्यासाठी पुढे आला असता त्यालाही गोळी लागली. नितीन याच्या पोटात गोळी लागून अतिरक्तस्त्रावाने तो जागीच ठार झाला. दरम्यान गोळीबारामुळे एकच गोंधळ माजला. पळापळ झाली. जमलेल्या लोकांनी गोरोबा कडील रिव्हॉल्वर काढून घेतली.
या घटनेची माहिती मिळताच वैरागचे पोलीस निरीक्षक विनय बहिर, सहाय्यक निरीक्षक महारूद्र परजणे हे तातडीने भातंबरे येथे गेले. त्यांनी आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले रिव्हॉल्वर व जिवंत काडतुस जप्त केले. गोरोबा महात्मे यास न्यायालयासमोर उभे केले असता त्यास पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.