मुंबई : ठाकरे सरकारचे मंत्री नवाब मलिक यांना NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘आपल्या बाबत खोटे दस्तावेज प्रसिद्ध केले जात आहेत. आपण या प्रकाराला चॅलेंज करणार आहोत. माझ्या मूळ गावी जा आणि तपासा. आपला जो जन्म दाखला सोशल मीडियावर प्रसिद्ध केला जात आहे, तो खोटा आहे. आपल्या विरोधात खोडसाळ प्रकार सुरू आहे. याला आपण कायदेशीर उत्तर देऊ’, असे वानखेडे म्हणाले.
समीर वानखेडे यांनी बॉलिवूडला बदनाम करण्यासाठी कारवाईचा धडाका लावला आहे. इतकचं नाही तर बॉलिवूडमध्ये दहशत पसरवून वसुली करत असल्याचा आरोपही नवाब मलिकांनी केला होता. त्यावर समीर वानखेडे यांनी मलिकांविरोधात कायदेशीर कारवाई करू असा इशारा दिला होता. परंतु आता मलिकांनी समीर वानखेडे यांच्या लग्नाचा जुना फोटो शेअर करत पहचान कौन असं म्हणत वानखेडेंवर पुन्हा निशाणा साधला आहे.
नवाब मलिकांच्या या नव्या आरोपावर समीर वानखेडे यांनी मोजक्याच शब्दात भाष्य करत त्याला उत्तर दिलं आहे. वानखेडे म्हणाले की, २००६ मध्ये माझं लग्न झालं होतं आणि कायदेशीररित्या घटस्फोट घेऊन मी दुसरं लग्न केलं, ज्या महिलेसोबत मी संसार केला नाही त्या महिलेचा फोटो वापरून कुटुंबावर हल्ला केला जातोय. माझ्यावर कितीही शिंतोडे उडवायचे ते उडवा. तपास भरकटवण्याचा प्रकार आहे. अतिशय खालच्या दर्जाची चिखलफेक सुरू आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
ड्रग्स माफियांवरील कारवाई वरुन चर्चेत आलेले NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे चर्चेत आले आहे. समीर वानखेडे यांचा बाप कोण? असा सवाल ठाकरे सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे हे वरूड तोफाचे रहिवाशी असून त्यांचे शालेय शिक्षण वाशीम जिल्हयातच झाले. मुंबई येथे पोलीस विभागात अधिकारी म्हणून नोकरी निमित्त गेले असता त्याठिकाणीच ते स्थायिक झाले, अशी माहिती आहे.
क्रुझवरील धाडी प्रकरणी पंचांनीच एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात गंभीर आरोप केले आहेत. त्याची एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयाने गंभीर दखल घेतली असून वानखेडेंना तातडीने दिल्लीला बोलावले आहे. वानखेडे यांची दिल्लीत खात्यांतर्गत चौकशी होणार असून त्यासाठीच त्यांना दिल्लीत पाचारण करण्यात आल्याचं एनसीबीचे मुख्य अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितलं.
मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांनंतर क्रूझ ड्रग्ज पार्टीवरील कारवाईतील पंच प्रभाकर साईल यांच्या दाव्यांमुळे वानखेडेंच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणात मनी लॉण्ड्रिंग झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या प्रकरणात फरार असलेल्या किरण गोसावी याचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल यानं पुढाकार घेत एनसीबीवर खळबळजनक आरोप केले आहेत. क्रूझ पार्टीवरील कारवाईवेळी आपण किरण गोसावीसोबत उपस्थित होतो आणि प्रकरणाचा साक्षीदार म्हणून माझ्याकडून कोऱ्या कागदावर सह्या घेण्यात आल्याचा खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे एनसीबीची आता मोठी कोंडी झाली आहे. साईल यांनी वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता वानखेडेंची खाते अंतर्गत चौकशी केली जाणार आहे.
एनसीबीच्या महासंचालकांनी वानखेडेंना उद्या दिल्लीला बोलावून घेतलं आहे. आढावा बैठकीसाठी वानखेडेंना दिल्लीत बोलावण्यात आलं आहे. वानखेडेंची चौकशी करण्यात येणार असून त्याची जबाबदारी ज्ञानेश्वर सिंग यांच्याकडे देण्यात आली आहे. याशिवाय वानखेडेंवर आरोप करणाऱ्या प्रभाकर साईल यांचीदेखील चौकशी केली जाणार आहे.
क्रुझवरील धाडीत पंच असलेल्या प्रभाकर साईल यांनी एक व्हिडीओ व्हायरल करून एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शाहरुख खानकडून 25 कोटींची मागणी करण्यात आली होती. त्यातील 8 कोटी रुपये वानखेडेंना मिळणार होते. आर्यन खानला सोडण्यासाठी ही डिलिंग होणार होती, असा दावा प्रभाकर साईल यांनी केला आहे. या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयाने या आरोपाची गंभीर दखल घेतली आहे.
एनसीबी अधिकारी किंवा कोणत्याही व्यक्तीची अजून चौकशी होणार आहे. चौकशी सुरू झाल्यानंतर त्याची माहिती दिली जाईल. दक्षिणी आणि पश्चिमी क्षेत्रातून काही माहिती मिळाली आहे. त्यावरून चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितलं.
दरम्यान, समीर वानखेडे आजच दिल्लीला रवाना होणार आहेत. संध्याकाळपर्यंत ते दिल्ली पोहोचणार असून दिल्लीत गेल्यावर त्यांची खात्यांतर्गत चौकशी करण्यात येणार आहे. खंडणीच्या अँगलनेच वानखेडे यांची चौकशी होणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.