नवी दिल्ली : टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानकडून भारताचा पराभव झाला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत इशान किशन चांगला असून तो रोहित शर्माला चांगला पर्याय ठरु शकला असता का ? असा सवाल विराटला करण्यात आला. यावर विराटने संताप व्यक्त केला. ‘तुम्हाला काय वाटते ? तुम्ही रोहित शर्माला टी-२० तून काढणार का ? जर तुम्हाला वादच हवा असेल, तर तसं सांगा, त्यानुसार मी उत्तर देतो,’ असे विराटने म्हटले.
सराव सामन्यात इशान किशन यानं चांगली कामगिरी केली. त्यामुळे जर आज इशान किशन खेळला असता तर त्यानं रोहित शर्मापेक्षा चांगली कामगिरी केली असती, असे तुला वाटत नाही का? , या प्रश्नावर विराट म्हणाला, हा खूप धाडसी प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटते सर? मी सर्वोत्तम संघ घेऊनच मैदानावर उतरलो, तुमचं मत काय?, तुम्ही खरंच ट्वेंटी-२० सामन्यातून रोहित शर्माला ड्रॉप केलं असतं?, ज्यानं ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत. डोक्यावर हात मारून म्हणाला, सर तुम्हाला काँट्रोव्हर्सी हवी आहे, तर मला आधीच सांगा, मी त्यानुसार उत्तर देईन.
https://t.co/5H0b8YCANI pic.twitter.com/LRzCkcc8Kw
— maddy (@224notout) October 24, 2021
आजवर पाकिस्तानविरुद्ध टी२० विश्वचषकात अजेय राहिलेल्या भारताला यंदा लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तानने सांघिक कामगिरीच्या जोरावर १० विकेट्सने भारतावर ऐतिहासिक विजय मिळवला. यासह त्यांच्या खात्यात अद्वितीय विक्रमाची नोंद झाली आहे.
या हाय व्होल्टेज सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली होती. भारताकडून पहिल्यांदा फलंदाजी करताना रोहित शर्मा आणि केएल राहुल हे दोन्हीही सलामीवीर फ्लॉप ठरले. पुढे विराट कोहलीने कर्णधार खेळी करत संघाचा डाव सावरला. त्याने ४९ चेंडूंमध्ये १ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ५७ धावांची खेळी केली. त्याच्याबरोबरच यष्टीरक्षक रिषभ पंतनेही ३९ धावांची ताबडतोब खेळी खेळली. यामुळे भारतीय संघ पाकिस्तानला १५२ धावांचे आव्हान देऊ शकला.
प्रत्युत्तरात भारताच्या एकाही गोलंदाजाला पाकिस्तानची विकेट घेता आली नाही. पाकिस्तानचे सलामीवीर मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक फलंदाज) आणि बाबर आझम (कर्णधार) यांच्या फलंदाजीपुढे भारतीय गोलंदाजांनी नांग्या टाकल्या. रिझवानने नाबाद ७९ आणि आझमने नाबाद ६८ धावा चोपत १७.५ षटकातच संघाला विजय मिळवून दिला. अशाप्रकारे पाकिस्तानने थेट १० विकेट्सने भारताचा लाजिरवाणा पराभव केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या विजयासह पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच १० विकेट्सने सामना जिंकण्याची किमया साधली आहे. याबरोबरच भारतीय संघ पहिल्यांदाच टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० विकेट्सने पराभूत झाला आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या या सर्वात छोट्या स्वरुपात बऱ्याचशा बलाढ्य संघांनी भारताला ९ विकेट्सने धूळ चारली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया (२००८, २०१२), वेस्ट इंडिज (२०१७) आणि दक्षिण आफ्रिका (२०१९) अशा एकाहून एक बळकट संघांचा समावेश आहे.
परंतु या संघांना सुद्धा जे जमले नाही, ते भारताचा कट्टर प्रतिद्वंद्वी पाकिस्तानने केले आहे. पाकिस्तान हा भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वात मोठ्या अंतराने विजय मिळवला पहिला आणि एकमेव संघ बनला आहे. इतकेच नव्हे तर, फक्त टी२० स्वरुपात नाही तर आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच १० विकेट्सने पराभूत होण्याची नकोशी वेळही पाकिस्तानने भारतावर आणली आहे.
संपूर्ण भारतभर हा सामना मोठ्या उत्साहात पाहिला गेला. भारतीय चाहत्यांचा थोडा हिरमोड झाला पण हा सामना अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला. सध्या सोशल मीडियावर या सामन्यासंदर्भात बऱ्याच गोष्टी शेअर केल्या जात आहेत.
भारत आणि पाकचा सामना म्हटलं की भारतीयांच्या अंगात विरश्री संचारते. काहीही झालं तरी पाकिस्तानला नमवलंच पाहिजे असं प्रत्येक भारतीयाला वाटतं. पण क्रिकेट हा एक खेळ असल्यामुळे यामध्ये यशापयश या गोष्टी ओघाने आल्याच. हा सामना भारताने गमावला असला तरी सध्या टीम इंडियाचा मोठेपणा आजच्या सामन्यात पाहायला मिळालं. पराभूत झाल्यानंतर कसलेही आढेवेढे न घेता टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने पाकिस्तानी खेळाडूंचं अभिनंदन केलं. विराटचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.