बीजिंग : चीनमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे विविध शहरात निर्बंध लागू केले जात आहेत. चीनच्या ४० लाख लोकसंख्या असलेल्या लांझोउ शहरात आता लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लोकांना घरातून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट येथे आढळला आहे. आरोग्य यंत्रणेला २४ तास अलर्ट राहण्यास सांगण्यात आले आहे.
चीनमध्ये पुन्हा करोना संसर्गाचा उद्रेक होण्याची चिन्हे आहेत. परदेशातून आलेल्या डेल्टा विषाणूमुळे येत्या काही दिवसांत रुग्णसंख्या व बाधित भागांची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
१७ ऑक्टोबरपासून ११ प्रांतांमध्ये डेल्टा प्रकाराचे रुग्ण आढळले असून, हे सर्व जण परदेश दौऱ्यावरून चीनमध्ये दाखल झाले होते.
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमध्येदेखील बदल झाल्यानं भीतीचं वातावरण आहे. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगभरातील २४.३६ कोटींपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची बाधा झालेली आहे. यापैकी ४९.४ लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. न्यूज एजन्सी आयएएनएसच्या अहवालानुसार, अमेरिकेवर कोरोनाचा सर्वात जास्त परिणाम झालेला आहे.त्या ठिकाणी ४ कोटी ५४ लाख ४४ हजार २२८ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली तर ७ लाख ३५ हजार ९३० जणांचा मृत्यू झालेला आहे.
सध्याच्या कोरोनाच्या प्रादुर्भावाचा चीन केंद्रबिंदू ठरत आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर चिनमध्ये हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यांनी चेतावणी दिली की एका आठवड्यात ११ प्रांतांमध्ये हा विषाणू पसरल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच जाईल. सोमवारी, चीनमध्ये संक्रमणाची ३५ प्रकरणे नोंदवली गेली, त्यापैकी निम्मी मंगोलियामध्ये सापडली आहेत. त्यामुळे चीनमधील या शहरात संपूर्ण लॉकडाउन करण्यात आले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गान्सू प्रांतात तसेच मंगोलियाच्या ग्रामीण भागांमध्ये बस व टॅक्सी सेवा बंद करण्यात आली आहे. मंगोलियातील एजिना प्रांतातील नागरिकांना सोमवारपासून घरातच राहण्याची सूचना करण्यात आली आहे. शनिवारी चीननमध्ये २९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये मंगोलिया, गान्सू, निंगशिया, बीजिंग, हेबेई, हुनानमधील रुग्णांचा समावेश आहे. करोनाची वाढती रुग्णसंख्या पाहून बीजिंग मॅरेथॉन रद्द करण्यात आली आहे.
चीनमध्ये काही महिन्यांपूर्वी डेल्टा वेरिएंट आढळल्यानंतर तातडीने पावले उचलण्यात आली होती. त्यानंतर संबंधित भागात करोना चाचणीवर भर देण्यात आला. त्याशिवाय इतर उपाययोजनाही आखण्यात आल्या. डेल्टा वेरिएंटवर नियंत्रण मिळवण्यास प्रशासनाला यश मिळाले होते. आता मागील काही दिवसांपासून पुन्हा बाधितांची संख्या वाढू लागल्याचे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
आशियातील अनेक देशांमध्ये डेल्टा प्रकारातील विषाणू आढळत आहेत. सिंगापूरमध्येही खबरदारी घेतली जात आहे. संपूर्ण लसीकरण झालेल्यांनाच १ जानेवारीपासून कार्यालयांमध्ये प्रवेश द्यावा, अशी सूचना करण्यात आली आहे.
पाठोपाठ रशियामध्ये देखील कोरोना संक्रमणाचा वेग वाढला आहे. रशियामध्ये सोमवारी (२५ ऑक्टोबर २०२१) एकाच दिवसात कोरोनाच्या ३७ हजार ९३० नवीन रुग्णांची नोंद झाली. ही रशियातील आतापर्यंतची सर्वोच्च रुग्ण संख्या आहे. गेल्या चोवीस तासात त्या ठिकाणी तब्बल १ हजार ६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.