सोलापूर : वडिलांच्या नावावर असलेली शेतजमीन विकल्याच्या कारणावरून झोपेत असलेल्या वृद्ध आजीच्या डोक्यात दगडी खलबत्त्या घालून नातवाने खून केला. ही घटना शहरातील दमाणी परिसरातील बॉबी चौकाजवळ गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली.
सीताबाई लक्ष्मण गायकवाड (वय ६५ रा.बुद्धविहार, बॉबी चौक) असे मयत झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. या प्रकरणात त्यांचा नातू लक्ष्मण चिदानंद गायकवाड (वय २९) याला पोलिसांनी अटक केली. त्याला ३ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने आज गुरुवारी दिला .
मयत सीताबाई गायकवाड यांची शेतजमीन कोरसेगाव (ता.अक्कलकोट) येथे होती. ती जमीन वडिलांच्या नावावर होती. आणि आजी ने परस्पर विकल्याचा राग लक्ष्मणला होता. त्या कासावरून त्यांच्यात नेहमी तक्रारी होत होते. काल रात्री सीताबाई गायकवाड या घरात झोपल्या होत्या. पहाटे दोन वाजेच्या सुमारास लक्ष्मण गायकवाड याने त्यांच्या डोक्यात दगडी खलबत्ता टाकला. त्यांना अवस्थेत पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र त्या उपचारापूर्वी मयत झाल्या. या घटनेची फिर्याद पोलीस शिपाई फिरोज तांबोळी यांनी फौजदार चावडी पोलिसात दाखल केली. त्याप्रमाणे पोलीसांनी लक्ष्मण गायकवाड याला खुनाच्या आरोपाखाली अटक करून पोलीस कोठडी घेतली. अटकेतील लक्ष्मण गायकवाड हा अविवाहित असून तो हॉटेलात वेटरचे काम करीत होता. असे पोलिसांकडून सांगण्यात आले. फौजदार भोईटे पुढील तपास करीत आहेत.
* किरकोळ भांडणातून काठीने सासूचे
डोके फोडले : सुनेवर गुन्हा दाखल
मंगळवेढा – पाणी भरण्याच्या किरकोळ भांडणातून सुनेने काठीने बदडून सासूचे डोके फोडले. ही घटना चिक्कलगी (ता.मंगळवेढा) येथे बुधवारी सकाळच्या सुमारास घडली.
गौराक्का संगप्पा बिराजदार (वय५५ रा. चिक्कलगी) असे जखमी सासूचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मीनाक्षी सिद्धण्णा बिराजदार या सुने विरुद्ध मंगळवेढ्याच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बुधवारी सकाळच्या सुमारास गौराक्का यांचा नातू हौदात पाणी भरत होता. त्यावेळी त्यांनी हौदात पाणी जादा सोडू नको असे सांगितले. ह तेव्हा सुनेने सासूला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. शिवीगाळ करू नको, असे म्हणताच सुनेने काठीने त्यांच्या डोक्यात मारहाण करून जखमी केले. अशी नोंद पोलिसात झाली. हवालदार येलपले पुढील तपास करीत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* महिलेस मारहाण : दिरावर गुन्हा
डोणज (ता.मंगळवेढा) येथील बिरोबा मंदिराजवळ माझ्यासोबत नेहमी भांडण करते या कारणावरून काठीने केलेल्या मारहाणीत भागीरथी धोंडप्पा पूजारी (वय ५०) ही महिला जखमी झाली. ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. जखमीने दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा चुलत दीर देवप्पा भारत पुजारी याच्याविरुद्ध मंगळवेढ्याच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हवालदार दुधाळ पुढील तपास करीत आहे .
* व्यापारी असल्याचे सांगून दिवसा घरातील दागिने पळविले
सांगोला – आम्ही डाळिंबाचे व्यापारी आहोत, तुमची बाग पहायची आहे. तुमच्या सासूला बोलवा अशी थाप मारून दोघा चोरट्यांनी महिलेच्या घरातील रोख रकमेसह ६७ हजाराचे दागिने पळविले. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास वझरे (ता.सांगोला) येथे घडली.
सोनाली अनिल गायकवाड (रा.वझरे) या मंगळवारी दुपारी शेतातील वस्तीवर काम करीत होत्या. त्यावेळी दोघा अनोळखी इसमांनी त्यांच्या घराजवळ येऊन आम्ही व्यापारी आहोत, तुमची डाळिंबाची बाग पहायची आहे असे सांगितले. त्या सासूला बोलण्यासाठी शेतात गेल्या होत्या. तेव्हा दोघांनी उघड्या घरात प्रवेश करून बेडरुमच्या गादीखाली ठेवलेले ११ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ३० हजाराची रोकड घेऊन पोबारा केला. हा प्रकार घडल्यानंतर सोनाली गायकवाड यांनी सांगोला पोलिसात फिर्याद दाखल केली. हवालदार इरकर पुढील तपास करीत आहेत .