चंदीगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (वय 79 ) यांनी त्यांच्या नव्या पक्षाचे नाव घोषित केले आहे. ‘पंजाब लोक काँग्रेस’ असे त्यांच्या नव्या पक्षाचे नाव असणार आहे. तसेच, कॅप्टननी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सात पानी पत्र लिहून पक्षाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, कृषी कायद्यांबाबत काही तोडगा निघाल्यास भाजपसोबत जागावाटपाचा करार होण्याची मला आशा आहे, असेही कॅप्टनने म्हटले होते.
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या डोळ्यादेखत नवज्योतसिंग सिद्धू यांची मनमानी सुरू राहिल्यानेच हा निर्णय घेतल्याचा टोलाही त्यांनी गांधी कुटुंबास लगाविला आहे. काँग्रेस नेतृत्वाने चालविलेल्या खच्चीकरणास कंटाळून पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी 18 सप्टेंबरला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी – वाड्रा यांना थेट लक्ष्य केले होते. त्याचप्रमाणे पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू हे पाकिस्तानचे एजंट असल्याचेही त्यांनी जाहिररित्या सांगितले होते.
अखेर, आज मंगळवारी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस पक्षाचा अधिकृतपणे राजीनामा पक्षाच्या हंगामी सोनिया गांधी यांच्या पाठविला. त्याचप्रमाणे ‘पंजाब लोक काँग्रेस’ हा नवा पक्ष स्थापन करीत असल्याचीही घोषणा त्यांनी यावेळी केली आहे. पत्रामध्ये, त्यांनी सोनिया गांधी यांना जोरदार टोला लगाविला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
‘पक्षामध्ये माझ्याविरोधात कारवाया होत असताना आपण त्याविरोधात कारवाई करण्याऐवजी डोळे मिटून बसण्याची भूमिका स्विकारली’, असा स्पष्ट आरोप कॅप्टन यांनी केला आहे.
‘पंजाब लोक काँग्रेस’ असे पक्षाचे नाव ठेवण्यावर निवडणूक आयोगाने कोणताही आक्षेप घेतला नाही. पक्षाचे चिन्ह अद्याप ठरले नसून निवडणूक आयोगाकडे तीन चिन्ह्यांची मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी एक निश्चित करण्यात येणार आहे. तसेच पक्षाची औपचारिक सुरुवात झाल्यानंतर पक्षाचे धोरण, रणनीती, दृष्टीकोन, ध्येय याबाबत सविस्तर माहिती देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आपल्यासोबत काँग्रेसचे बरेच आमदार आणि खासदार असल्याचा दावा कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केला आहे. शेतकरी आंदोलनाचा मुद्दा सुटल्यानंतर पंजाब विधानसभा निवडणूक 2022 करता भाजप यांच्या युतीबद्दल मी भाष्य करणार आहे. पुढील वर्षी पंजाबमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामुळे नव्या पक्षाची स्थापना झाल्यानंतर आता त्याचा काँग्रेसला नेमका किती तोटा होतो, याकडे आता पहावे लागणार आहे.