बार्शी : बार्शी तालुक्यातील वैराग येथील बाजारपेठेत व्यापारी पिता-पुत्रांना विनाकारण मारहाण करुन दहशत माजविणार्या सैफन गालीब शेख, मौसीन शेख, बंडु सातपुते, लखन सातपुते, अमोल चोपडे व खांडेकर अशा एकूण सहाजणांविरोधात वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत प्रसाद नागनाथ धोकटे यांनी फिर्याद दिली आहे. धोकटे कुटुंबियांचे वैराग बाजारपेठेतील गांधी चौकात उत्कर्षा हे कापड विक्रीचे दुकान आहे. सध्या दिवाळीनिमित्त बाजारपेठेत गर्दी आहे. गर्दीमुळे दुकानासमोरील वाहतूकीस अडथळा होवू नये म्हणून त्यांचे वडिल नागनाथ धोकटे हे प्रयत्न करत होते. दुपारी 4 च्या सुमारास सैफन शेख याने आपली दुचाकी त्यांच्या दुकानासमोर उभी केली होती.
त्यामुळे त्यांनी त्यास दुचाकी बाजूला लावण्यास सांगितली. त्यावर त्याने, ये म्हाता-या तुला मी कोण आहे माहीती नाही का, तु मला गाडी बाजुला सांगणारा कोण, रस्ता काय तुझ्या बापाचा आहे काय? तुला लय मस्ती आहे काय? दोन मिनिटात तुझा माज उतरवतो तु या दुकानावर मोठा झाला ना हे कापड दुकान व मसाला दुकान फॅक्टरी जाळून टाकतो, थांब 10 मिनिटात आलोच आणि तुला बघुन घेतो असे म्हणून निघून गेला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
काही वेळातच आपल्या साथीदारांना घेवून आला. फिर्यादीला ओढून दुकानाबाहेर आणले आणि वैराग शहरात आमचा कुणीही नाद करत नाहीत, तु आज आमच्या नादाला लागलास याचा परिणाम तुला मोजावा लागणार, असे म्हणून रस्त्यावर चार चौघांत दहशत निर्माण करून काठ्यांनी मारहाण केली. यावेळी पोलिसांना फोन लावा नाहीतर आमचा जीव जाईल, असे ते मोठ्याने ओरडल्यानंतर आरोपी तेथून पळून गेले.
* ट्रॅक्टरचे चाक अंगावर पडल्याने दुचाकीच्या पाठीमागे बसलेला इसम ठार
सोलापूर – ट्रॅक्टरचे चाक नेताना दुचाकी घसरून ट्रॅक्टरचे चाक अंगावर पडल्याने दुचाकीच्या पाठीमागे बसलेला गंभीर जखमी होऊन मरण पावला. हा अपघात वरकुटे (ता. मोहोळ) येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडला.
हरिदास मनोहर हजारे (वय५५ रा.वरकुटे) असे मयताचे नाव आहे. काल मंगळवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास ते ट्रॅक्टरचे चाक घेऊन दुचाकीच्या पाठीमागे बसले होते. त्यावेळी दुचाकी उलटून ट्रॅक्टरचे चाक अंगावर पडल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.उपचारादरम्यान ते रात्रीच्या सुमारास मरण पावले. या अपघाताची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
* विष प्राशन केलेल्याचा अखेर मृत्यू
सौंदणे (ता. मोहोळ) येथे राहणाऱ्या विठ्ठल लक्ष्मण क्षीरसागर (वय ३८) हा शासकीय रुग्णालयात उपचार घेताना बुधवारी दुपारी मरण पावला. काल मंगळवारी सकाळच्या सुमारास त्याने कर्जास कंटाळून स्वतःच्या शेतात विष प्राशन केले होते. त्याला मोहोळ येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरात दाखल करण्यात आले होते. अशी प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.