सोलापूर : श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे अर्थात देहू-आळंदी ते पंढरपूर या दोन पालखी मार्गांच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग केंद्रीय मंत्री वरा नितीन गडकरी सोमवार, ८ नोव्हेंबर रोजी पंढरपूरला येणार आहेत तर त्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हीसीद्वारे उपस्थिती लावणार आहेत.
संताच्या पालखी मार्गाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याचे सांगत मागील काही दिवसापूर्वी नितीन गडकरी यांचा दौरा रद्द झाला होता. त्यानंतरही आता पंतप्रधान मोदी यांची प्रत्यक्ष उपस्थिती राहणार नसून व्हीसीतून संबोधित करणार आहेत. या महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील काम प्रगतीपथावर आहे.
दरम्यान, गडकरी हे दिल्ली ते पुणे असे विमानाने सोमवारी सकाळी येणार आहेत. पुणे ते पंढरपूर हेलिकॉप्टरने प्रवास करणार आहेत. गडकरी विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत.
त्यानंतर आमदार प्रशांत परिचारक यांच्या निवासस्थानी १ वाजता भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी २.१५ वाजता रेल्वे मैदानावर राष्ट्रीय महामार्गाच्या भूमिपूजनाला हजेरी लावणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे भूमिपूजन करून ऑनलाईनद्वारेच संबोधित करणार आहेत. यानंतर नितीन गडकरी हेलिकॉप्टरने पुण्याकडे रवाना होणार आहेत. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, तीन जिल्ह्यातील पालकमंत्री, खासदार, आमदार, वारकरी मंडळी उपस्थित राहणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
संपूर्ण वारकरी संप्रदायाचे लक्ष लागलेल्या पंढरपूर ते आळंदी या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि देहू ते पंढरपूर या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे भूमिपूजन येत्या सोमवारी (ता. ८) पंढरपूर येथे रेल्वे मैदानावर होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संतमंडळींच्या हस्ते या राष्ट्रीय पालखी महामार्गाचे भूमिपूजन होणार आहे.
येत्या सोमवारी पंढरपुरात हा कार्यक्रम होत आहे. पंढरपूर ते आळंदी या संत ज्ञानेश्वर पालखी मार्गाचा ९६५, तर पंढरपूर ते आळंदी या संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचा ९६५ असा क्रमांक आहे. सध्या वाखरी ते मोहोळ ४४ किलोमीटर, वाखरी ते खडूस ३० किलोमीटर आणि खुसी ते धर्मपुरी ४० किलोमीटर रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर १२ पालखीस्थळे, तर श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर ११ पालखीतळ असणार आहेत.
दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंढरीत दरवर्षी लाखो भाविक आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर या पायी पालखी सोहळ्यात सहभागी होतात. वारीदरम्यान वारकर्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. या महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील काम प्रगतीपथावर आहे.
हा महामार्ग सहापदरी होणार असून पायी चालत वारी करणार्या भाविकांची मोठी सोय होणार आहे. साडेदहा हजार कोटी रुपयांचे हे काम प्रगतीपथावर आहे.
कोरोनामुळे नियोजित भूमीपूजन कार्यक्रम घेता आला नव्हता. त्यामुळे येत्या सोमवारी हा कार्यक्रम पंढरपुरातील रेल्वे मैदानावर होत आहे. दरवर्षी लाखो वैष्णव भाविक देहू-आळंदीच्या या पालखीमार्गावरून देहू-आळंदी ते पंढरपूर या पायी पालखी सोहळ्यात सहभागी होतात. या वारीदरम्यान वारकर्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी या मार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या या महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील काम प्रगतीपथावर आहे.