सोलापूर : पुणे महामार्गावरील सावळेश्वर येथे येथे अनोळखी वाहनाच्या धडकेने दुचाकीवरील एक ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी (ता. ४) दुपारच्या सुमारास सावळेश्वर येथील ओढ्याच्या पुलावर झाला.
शशिकांत नरहरी कुलकर्णी (वय ६०रा.पाकणी ता. दक्षिण ) असे मयताचे नाव आहे. तर अण्णासाहेब निवृत्ती खंडागळे ( वय २०, रा. पिरटाकळी ता. मोहोळ) हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात. खंडागळे आणि कुलकर्णी हे दोघे दुचाकीवरून मोहोळ ते सोलापूर असा प्रवास करीत दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास दुचाकी सावळेश्वर येथील ओढ्याच्या पुलावर आली होती.
त्यावेळी सोलापूरच्या दिशेने जाणारी अनोळखी चार चाकी वाहन धडकल्याने दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता शशिकांत कुलकर्णी हे उपचारापूर्वी मयत झाले. या अपघाताची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* फटाके आणण्यास गेलेल्या तरुणाचा अपघातात दुर्देवी मृत्यू
बार्शी : दिवाळी सणासाठी तेरखेड्यावरुन फटाके आणण्यास गेलेल्या तरुणाचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जागेवरच मृत्यू झाला. बार्शी-सोलापूर रस्त्यावर पानगावच्या अलिकडे असलेल्या सोमाणी मळ्याजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर धडक देणार्या वाहनाचा चालक पळून गेला. बिरुदेव अभिमान पुजारी (रा. सावळेश्वर ता. मोहोळ ) असे मयताचे नाव असून त्याचा मावसभाऊ विशाल तानाजी शेंडगे (रा. मानेगाव ता. बार्शी) याने दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
बिरुदेव पुजारी हा उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील तेरखेडा या फटाके निर्मितीसाठी प्रसिध्द असलेल्या गावात सकाळी 12 वा. दुचाकीवरुन फटाके आणण्यासाठी गेला होता. जाताना तो विशाल याला मानेगाव येथे येवून भेटून गेला होता. परतताना तो पुन्हा मानेगाव येथे येवून भाच्च्याला दिवाळी सणासाठी गावी घेऊन जाणार होता. त्यामुळे त्याच्या परतण्याची सर्वजण प्रतिक्षा करत होते.
मात्र रात्र झाली तरी तो न परतल्यामुळे विशालने त्याच्या फोनवर संपर्क साधला असता फोन उचलणार्याने त्यांना त्याचा अपघात होवून तो जागेवर बेशुध्द अवस्थेत पडलेला असल्याचे सांगितले. त्यामुळे ते तातडीने अपघातस्थळी गेले असता बिरुदेव डोक्यास व पायाला गंभीर मार लागलेल्या अवस्थेत होता.
त्याच्या जवळ त्याची मोटार सायकलची (एम.एच.13/ए.यु 8096) मोडतोड होऊन पडलेली होती. रात्री 08:00 वा सुमारास कोणत्या तरी अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीस समोरुन जोराची धडक देवुन त्यास गंभीर जखमी करुन व वाहनाचे नुकसान करुन कोणतीही वैद्यकीय मदत न पुरविता निघून गेल्याचे कळले. दवाखान्यात नेले असता त्यास मृत घोषित करण्यात आले.