सोलापूर : पुणे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या सिम्बॉयसिस स्पोर्ट्स सेंटर आयोजित नवरात्र बुद्धिबळ महोत्सवात बारा वर्षाखालील गटात सोलापूरच्या आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू श्लोक शरणार्थी याने सात पैकी साडेसहा गुण प्राप्त करत स्पर्धेत वर्चस्व राखत प्रथम क्रमांक पटकाविला तर विरेश शरणार्थी याने देखील सात पैकी सहा गुण प्राप्त करत द्वितीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश मिळवले आहे.
या स्पर्धेत १५ आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळांडूसह एकूण ५९ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. तसेच खुल्या गटात देखील वीरेशने सहभाग घेत मानांकित खेळाडूंना पराभवाचे धक्के देत आंतरराष्ट्रीय मास्टर विक्रमादित्यला पराभूत करत स्पर्धेतील खळबळजनक विजय नोंदविला व १४ वर्षाखालील गटात अव्वल क्रमांक प्राप्त केला.
श्री सद्गुरु चेसमारटीझ स्मार्ट म्युझिक अकॅडमीच्या वतीने आयोजीत हुबळी येथे झालेल्या स्पर्धेत सात वर्षाखालील गटात सोलापूरच्या प्रेयस वाघमारे याने चमकदार कामगिरी करत चार पैकी चार गुण मिळवीत स्पर्धेत वर्चस्व ठेवत विजेतेपदाला गवसणी घातली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोलापूरच्याच उदयोन्मुख ओम चिनगुंडे याने देखील ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत विविध स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवले आहे. सर्व यशस्वी विजेत्यांना राष्ट्रीय प्रशिक्षक सुमुख गायकवाड व आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त उदय वगरे यांचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडूंनी मिळवलेल्या यशाची दखल घेत सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन व सोलापूर चेस अकॅडेमी यांच्या संयुक्त विद्यमाने वालचंद शिक्षण समूहाचे विश्वस्त पराग शहा यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. प्रदीप वाघमारे, सहा. पोलीस उपायुक्त डॉ. प्रीती टिपरे तसेच सोलापूर चेस अकॅडेमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर, सचिव सुमुख गायकवाड, अतुल कुलकर्णी, उदय वगरे, दिनेश जाधव, नामवंत उद्योजक शिवानंद चिनगुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी दयानंद शरणार्थी यांची महाराष्ट्र शासनाकडून पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती झाल्याबद्दल पोलीस उपायुक्त डॉ. प्रीती टिपरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. खेळाडूंनी संपादन केलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल सोलापूर डीस्ट्रीक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, उद्योजक रवींद्र जयवंत, नितीन काटकर, गोपाळ राठोड, संतोष पाटील, प्रशांत गांगजी, दिपाली पुजारी, गणेश मस्कले, निहार कुलकर्णी, विजय पंगुडवाले, प्रशांत पिसे, जयश्री कोंडा, रोहिणी तुम्मा, नागेश पाटील, विशाल पटवर्धन, रोहित पवार, श्रेयांस शहा, चंद्रशेखर कोरवी, युवराज पोगुल आदींनी अभिनंदन केले.