बार्शी : शहरातील तूळजापूर रस्त्यावरील पाटील चाळीतील रहिवाशी असलेल्या किशोर मारुती चौधरी या हॉटेल व्यवसायिकाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्येमागचे नेमके कारण कळू शकले नसले तरी घरगुती कारणामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचा अंदाज आहे.
त्यांच्या पश्चात आई-वडिल, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. तुळजापूर रस्त्यावरील कदम वस्तीमध्ये त्यांचे अबोली या नावाने हॉटेल होते. किशोर चौधरी हे सामाजिक – राजकीय कार्यकर्ते होते. समाजातील सर्व स्तरात त्यांचा वावर होता. यापूर्वी त्यांनी आडत व्यवसाय केला होता. अलिकडेच त्यांनी हॉटेल व्यवसायास सुरुवात केली होती. त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत होती.
* नान्नज येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
सोलापूर – नान्नज (ता. दक्षिण सोलापूर) येथे राहणाऱ्या एका ४७ वर्षीय शेतकऱ्याने स्वतःच्या शेताजवळ गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. विष्णू गेनदेव माने (४७ रा. नान्नज) असे मयताचे नाव आहे. त्याचा मृतदेह शेताच्या शेजारी असलेल्या बाभळीच्या झाडाला सुताच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मयत विष्णू माने यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही .हवालदार पाटील पुढील तपास करीत आहेत .
* भंडारकवठे येथे चक्कर येऊन पडल्याने मजुराचा मृत्यू
भंडारकवठे ( ता. दक्षिण सोलापूर ) येथील पाटील वस्तीवर ऊस तोडत असताना चक्कर येऊन पडल्याने सुहास सिद्धाराम पिटेकर ( वय ३१ रा.देवपूर जि. बुलढाणा ) हा मजूर उपचारापूर्वीच मरण पावला. मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास तो इतर मजूरासोबत पाटील वस्तीवर उस तोड करत होता. त्यावेळी तो चक्कर येऊन कोसळला .त्याला बेशुद्ध अवस्थेत विनोद पिटेकर (भाऊ )यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तो उपचारापूर्वीच मयत झाला .या घटनेची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* बाळे येथे पादचारी ठार
बाळे परिसरातील पाटील आटोमोबाईल जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने अर्जुन नागप्पा सोनवणे (वय ६०रा. वांगी ता. दक्षिण सोलापूर ) हे मयत झाले. हा अपघात काल सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडला. ते पायी सर्विस रोड वरून लघुशंकेसाठी निघाले होते .त्यावेळी हा अपघात घडला. याची नोंद फौजदार चावडी पोलिसात झाली आहे.
* पोखरापूर येथे तलवारीने हल्ला
पोखरापूर तालुका मोहोळ येथे पूर्वीच्या भांडणातून तलवारीने केलेल्या मारहाणीत गणेश शिवाजी चव्हाण (वय ३५) हा गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (ता. ९) पहाटेच्या सुमारास घडली. त्याला मोहोळ येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. किरण काळे आणि विकास रोकडे या दोघांनी मारहाण केली अशी प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे .
* अकलूजच्या सहकार महर्षी बँकेत २७ कोटींचा अपहार; जनरल मॅनेजरसह ५ जणांविरोधात गुन्हा
अकलूज : अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील – सहकारी बँकेत बँकेचे जनरल मॅनेंजर व पाच शाखा व्यवस्थापकांनी मिळून २७ कोटी ६ लाख १९,८१४ रुपये रकमेचा अपहार केला आहे, अशी फिर्याद बँकेच्या वैधानिक लेखा परीक्षकांनी त्यांच्या विरोधात पोलीसात दाखल केली आहे.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील बँक अकलूज परिसर तसेच सोलापूर जिल्ह्यात कार्यरत असून बँकेच्या विवीध ठिकाणी शाखाही आहेत. बँकेचे वैधानिक लेखा परीक्षक गोकुळ बंकटलालजी राठी (वय ६१ रा. पर्वती, पुणे) यांनी अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
फिर्यादीत बँकेचे जनरल मॅनेजर नितीन बाळकृष्ण उघडे यांनी २४ कोटी ९८ लाख २१,८५३ रुपये, टेंभुर्णी शाखेचे शाखा व्यवस्थापक रविंद्र पताळे यांनी ५३ लाख ८४ हजार, करमाळा शाखा व्यवस्थापक समीर दोशी यांनी १ कोटी ४० लाख, ८४,१६१, सोलापूर शाखा व्यवस्थापक प्रदीप उघडे यांनी ५३ लाख ३४ हजार इंदापूर शाखेचे व्यवस्थापक सचिन सावंत यांनी ६ लाख ५० हजार तर कोथरुड पुणे शाखेचे व्यवस्थापक राहुल भिंगारदिवे यांनी ३३ लाख ४५ हजार ८०० रुपये असा एकूण २७ कोटी ६ लाख १९,८१४ रुपयाचा अपहार केला आहे, असं पोलीस फिर्यादीत म्हंटल आहे.
या सर्वांच्या विरोधात अकलूज पोलीस ठाण्यात ठेवीदारांचे वित्तीय संस्थामधील हिन संबंधाचे संरक्षण या कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ३ मार्च २१ ते २० ऑक्टोंबर २१ या कालावधीत हा प्रकार घडला आहे, असंही लेखा परीक्षकांनी फिर्यादीत म्हंटल आहे.
सोलापूरातील जुनी असणारी लक्ष्मी बँक नुकतीच मोठ्या कर्जदारांनी कर्जे थकवल्याने अडचणीत आली आहे. या बँकेची चर्चा थांबत नाही, तोपर्यंत आता सहकार महर्षी बँकेच्या गैरकारभाराचा प्रकार पुढे आल्याने सहकारी बँकाच्या कामकाजासंदर्भात पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.