मुंबई : हायड्रोजन बाँब फोडण्याचा इशारा देणाऱ्या नवाब मलिक यांनी आज विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे गुन्हेगारी जगताशी संबंध आहेत, असा आरोप केला आहे. अंडरवर्ल्डशी संबंधित रियाज भाटी हा पंतप्रधानांपर्यंत कसा पोहोचला ? सहार विमानतळावर रियाज भाटीला 2 बनावट पासपोर्टनिशी पकडण्यात आले होते. त्याला लगेच जामीन कसा मिळाला? फडणवीसांचे रियाज भाटीशी संबंध काय? असे सवाल मलिक यांनी फडणवीस यांना केले आहेत.
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. बनावट नोटांच्या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचं नवाब मलिकांनी म्हटलं. 8 ऑक्टोबर 2017 रोजी मुंबईतील बीकेसीत एक छापेमारी झाली यावेळी छापेमारीत 14 कोटी 56 लाख पकडले गेले. हे प्रकरण दाबण्यासाठी फडणवीसांनी मदत केली, असंही ते म्हणाले.
अनेक गुन्हेगारांची सरकारी पदांवर वर्णी लावण्याचं काम फडणवीसांनी केलं, असे गंभीर आरोप अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केले आहेत. नोटबंदीनंतर वर्षभर राज्यात एकही मोठी कारवाई का झाली नाही, त्याचे धागेदोरे कुठपर्यंत होते, या संदर्भातही मलिक यांनी खळबळजनक दावे केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबर २०१६ ला नोटबंदी जाहीर केली. दहशतवाद, काळा पैसा संपवण्यासाठी नोटबंदी करत असल्याचं मोदींनी सांगितलं. नोटबंदीमुळे बोगस नोटा संपतील, असाही दावा होता. यानंतर मध्य प्रदेश, पंजाब, तामिळनाडूत बनावट नोटा पकडल्या गेल्या. पण ८ ऑक्टोबर २०१७ पर्यंत महाराष्ट्रात बनावट नोटांचं एकही प्रकरण समोर आलं नाही. कारण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात बोगस नोटांचा खेळ राज्यात सुरू होता, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
८ ऑक्टोबर २०१७ बीकेसीमध्ये छापेमारी करून १४ कोटी ५६ लाखांच्या बनावट नोटा पकडल्या गेल्या. हे प्रकरण दाबून टाकण्यात आलं. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मदत केली. या प्रकरणात मुंबई, पुण्यातून काही जणांना अटक झाली. नवी मुंबईतूनही एकाला ताब्यात घेण्यात आलं. पण १४ कोटी ५६ लाखांचं ८ लाख ८० हजार असल्याचं सांगून प्रकरण दाबलं गेलं. या प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंकडे होता, असं मलिक यांनी सांगितलं.
बोगस नोटा अर्थव्यवस्थेत आणण्याचं काम पाकिस्तान, आयएसआयकडून करण्यात येतं. त्याचा थेट संबंध देशाच्या सुरक्षेशी आहे. पण तरीही या प्रकरणाचा तपास एनआयएकडे गेला नाही. नोटा कुठून आल्या याचा तपास पुढे गेला नाही. कारण तत्कालीन सरकारचं संरक्षण या सगळ्याला होतं, असा आरोप मलिक यांनी केला.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना उत्तर देण्याचे आदेश दिलेले असतानाच आता एनसीबीचे झोनल अधिकारी नवाब मलिक यांच्या मेहुणीने दाखल केलेल्या तक्रारीने मलिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
आता समीर वानखेडे यांच्या मेहुणीने गोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या तक्रारीत नवाब मलिक आणि निशांत वर्मा यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 354, 354 ड, 503 यासह स्त्रियांचं अश्लील प्रदर्शन प्रतिबंध कायदा-1986 च्या कलम 4 खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समीर वानखेडे यांच्या मेहुणीबद्दल ट्वीट करत मलिकांनी सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर आता मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी क्रांती रेडकर हिची बहीण आणि एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांची मेहुणी हर्षदा रेडकर यांच्याविषयी ट्वीट केलं होतं. हे ट्वीट करतानाच मलिक यांनी समीर वानखेडे यांना प्रश्नही विचारला होता.