सोलापूर : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून द्यायच्या एका जागेसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून यामधून सोलापूर जिल्ह्याला वगळण्यात आलेले आहे, महाविकास आघाडीने सत्तेचा गैरवापर करून हा खटाटोप केला आहे. त्यामुळे या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी भाजपने केली असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी दिली आहे.
पूर्वीच्या नगरपालिका आणि नगरपंचायती महापालिका आणि जिल्हा परिषदेचे जवळपास 415 पैकी 410 मतदार पात्र आहेत. त्यामुळे अस्तित्वात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यकारी मंडळातील 75 टक्के पेक्षा अधिक सदस्य पात्र ठरतात. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याची निवडणूक होवू शकते. मात्र या निवडणुकीतून सोलापूर जिल्ह्याला वगळण्यासाठी नव्याने घोषित झालेल्या सहा नगरपंचायती आणि मुदत संपलेल्या मोहोळ माढा आणि माळशिरस या तीन नगरपरिषदा गृहीत धरून जिल्ह्यातील आकडेवारी चुकीची दाखवण्यात आली आहे.
चुकीची आकडेवारी दाखवून जिल्ह्यातील विधान परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्याचा खटाटोप राज्य शासनातील काही मंडळींनीच केला असल्याचा आरोप भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केला आहे. त्यासाठी आता थेट न्यायालयात जाण्याची आमची तयारी असल्याचे सांगितले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जिल्ह्यात भाजपची मोठी ताकद असून महाविकास आघाडी या निवडणुकीला घाबरली आहे. त्यामुळे जिल्ह्यात होणारी नामुष्की टाळण्यासाठी हा प्रकार केला असून याला आता न्यायालयात दाद मागू, असा इशारा देशमुख यांनी दिला आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्ह्यातील प्रशासनाला हाताशी धरून हा उद्योग केलेला आहे. पालकमंत्र्यावरती कोणाचा दबाव आहे हे उभ्या महाराष्ट्राला माहीत असल्याचाही आरोप देशमुखांनी केला आहे.