मुंबई : हायकोर्टाने दिलेले आदेश कर्मचाऱ्यांचे हित बघून दिलेत. त्यांची विलिनीकरणाची मागणी मोठी आहे. त्यासाठी समिती नेमली आहे. हा आदेश जसा आम्हाला लागू, तसा त्यांनाही लागू होतो. यात भडकवणाऱ्या नेत्याचे नुकसान होत नाही, कामगारांचे होत आहे, असं परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले. तसेच कारवाई करण्याची इच्छा नाही. काही राजकीय पक्ष पोळी भाजून घेत आहेत त्यांना बळी पडू नका, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी आवाहन केले.
राज्यभरातून एसटी कामगार मुंबईत दाखल झाले होते. एसटी कामगार आपल्या मागण्यांसाठी भाजपच्या नेतृत्त्वात आज मंत्रालयाच्या दारात ठिय्या आंदोलन केले. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्त्वात हा मोर्चा मंत्रालयावर धडकला. गोपीचंद पडळकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्याद्वारे एसटी कामगारांना दीर्घ लढाईचं आवाहन केलंय.
एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे यासाठी मागील तीन दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या, गोपिचंद पडळकर आज आंदोलनस्थळी दाखल झाले. परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. किरीट सोमय्या आणि गोपीचंद पडळकरांना आकाशवाणी आमदार निवासस्थानाच्या बाहेरून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
आझाद मैदानावर गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं,’जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत मुंबई आपण सोडणार नाही.’ पडळकर म्हणाले, ’35 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या अश्रू पुसण्याची गरज होती त्यांच्याकडे बघण्याचा गरज होती. हे मंत्री अनिल परब अवमान याचिका दाखल करायला निघाले आहेत त्यांच्या वर कारवाई करत आहेत. कर्मचारी मुंबईत येऊ नये यासाठी सरकारने प्रयत्न केले पण तरी तुम्ही आलात. जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत मुंबई आपण सोडणार नसल्याचे सांगितले होते.
सदाभाऊ खोत म्हणाले, ‘या सरकारने त्रास द्यायाच काम केले आहे तरी सरकारच्या छाताडावर बसून हे वाघ आज येथे आले आहेत. वाशी टोल नाक्यांवर आम्हाला अडवलं. पण तरीही आम्ही आझाद मैदानावर आलो. 4 महिन्याचा वेळ द्या म्हणताय सरकार, अरे 4 महिन्यात काय भारत पाकिस्तान सीमा रेषाचा प्रश्न आहे का, हा परिवहन मंत्री नही क्रूरकर्मा आहे.अभी नही तो अभी नही, मला बघायचं आहे की यांच्यात दम किती आहे, न्याय मिळाल्याशिवाय आता शांत बसायचं नसल्याचा इशारा दिला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
प्रवीण दरेकर म्हणाले, ‘किरीट भाई तुमच्यामुळे अनिल परब पळायला नको कारण तुमच्या मुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांची पळापळ होते. जेव्हा एखादा कामगार आंदोलन हातात घेतो तेंव्हा त्याला कोणाचा बाप अडवू शकत नाही. जेव्हा एखादा कामगार आंदोलन हातात घेतो तेंव्हा त्याला कोणाचा बाप अडवू शकत नाही. संकटाच्या काळात काम करायला एसटी कर्मचारी लागतो आणि विलीनिकरणाचा विषय आला की अवमान याचिका दाखल करायची. अनिल परब यांनी शब्द दिला होता कारवाई करू नका, संघटनांना विनंती आहे की तुमच्याकडे मोर्चा वळवायला लावू नका, असा इशारा दिला.
मागील तीन दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यातच आज संपाविरोधातील याचिकेवर हायकोर्टात सुनावणी झाली. एस. टी. महामंडळानं संपकऱ्यांविरोधात अवमान याचिका सादर केली आहे. शुक्रवारपर्यंत कामगार संघटनांना अवमान याचिकेवर उत्तर सादर करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश देण्यात आले आहेत. 343 जणांविरोधात अवमान केल्याबद्दल नोटीस जारी करण्यात आली आहे. सोमवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या सेवेत सामावून घ्यावं या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हे काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. कर्मचारी संपावर ठाम असल्यानं आज तिसऱ्या दिवशीही एसटी रस्त्यावर नाही. याऊलट संप अधिक चिघळणार असल्याचं दिसतयं. आज एसटी कर्मचाऱ्यांचा मंत्रालयावर मोर्चा काढण्यात आला.
दरम्यान, एस.टी. कर्मचारी संपाविरोधात महामंडळ आज अवमान याचिका हायकोर्टात सादर करणार आहेत. एकंदरीतच एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची चिन्ह दिसत नाही.
दरम्यान, राज्य सरकारने आता थेट एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यभरात आत्तापर्यंत 376 एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. लातूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार जिल्ह्यात निलंबनाच्या कारवाया करण्यात आल्या आहेत. तसेच कारवाई झाली तरी संप सुरूच ठेवणार असल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतलीय.
* एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
राज्यभरातील 16 विभागातील 45 आगारामधील 376 एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातल्या 18 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय. 31 ऑक्टोबर रोजी गणेशपेठ बस स्थानकावर या कर्मचाऱ्यांनी काही राजकीय कार्यकर्त्यांसोबत आंदोलन केलं होतं. त्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय.
चंद्रपूर जिल्ह्यातील 14 संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचं प्रशासनाकडून निलंबन करण्यात आलं आहे. नाशिक विभागातील कळवण आगारातील 17 कर्मचारी, वर्धा विभागातील 40 कर्मचारी, गडचिरोली विभागातील 14 कर्मचारी, लातुर विभागातील 31 कर्मचारी, नांदेड विभागामधील आगारातील 58 कर्मचारी, भंडारा आगारामधील 30 कर्मचारी, सोलापुर विभागातील अक्कलकोट आगारामधील 2 कर्मचारी, यवतमाळ विभागातील 57 कर्मचारी, औरंगाबाद विभागातील औरंगाबाद – 1 आगारातील पाच कर्मचारी, परभणी विभागातील आगारातील 10 कर्मचारी, जालना विभागातील जाफ्राबाद व अंबड आगारातील 16 कर्मचारी, जळगाव विभागातील अंमळनेर आगारातील चार कर्मचारी, धुळे विभागातील धुळे आगारातील दोन कर्मचारी, सांगली विभागातील जत, पलुस, इस्लामपूर, आटपाडी आगारातील 585 कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.