मुंबई : ठाकरे सरकारचे मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचे दिसत आहे. पुण्यातील वक्फ बोर्डाच्या जमीन खरेदी-विक्रीच्या संदर्भात ही छापेमारी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. वक्फ बोर्ड हे नवाब मलिक यांच्या खात्याच्या अंतर्गत येते. या कारवाईमुळे नवाब मलिकांचे संकट वाढण्याची चिन्हे आहेत.
नवाब मलिक यांच्या मंत्रालयांतर्गत येणाऱ्या वक्फ बोर्डाशी संबंधित पुणे घोटाळ्याची ईडीने चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी ईडीने ईसीआयआर नोंदवला आहे. वक्फच्या एकूण ७ ठिकाणी शोध सुरू असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी हे छापे टाकण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. वक्फ जमीन प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांच्या एफआयआरच्या आधारे हा तपास सुरू करण्यात आल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले.
ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक झाल्यापासून मंत्री नवाब मलिक आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याच दरम्यान, नवाब मलिक यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर देखील राज्यातील ड्रग्ज पेडलर्सला संरक्षण दिल्याचा आरोप केला होता. देवेंद्र फडणवीस आणि नवाब मलिक यांनी एकमेकांवर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचेही आरोप केले होते. या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असताना आता मलिक यांच्या मंत्रालयांतर्गत येणाऱ्या वक्फ बोर्डाशी संबंधित पुणे घोटाळ्याची ईडीने चौकशी सुरू केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान, अमृता फडणवीस यांची मलिकांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. आपल्याविरोधातील ट्विट ४८ तासांच्या आत डिलीट करावे आणि माफी मागावी, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहावे, असे अमृता यांनी म्हटले. याआधी नवाब मलिक यांच्या मुलीने देवेंद्र फडणवीसांना कायदेशीर नोटीस पाठवून माफी मागावी, असे म्हटले होते.
नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आरोप करताना, ड्रग्ज पेडलर जयदीप राणा याच्याकडून अमृता फडणवीस यांच्या अल्बमला अर्थ साहाय्य करण्यात आले होते, असा आरोप केला होता. त्यानंतर अमृता फडणवीस यांच्याकडून हे आरोप फेटाळण्यात आले होते. नवाब मलिक यांनी राणा आणि फडणवीस यांचे संबंध असल्याचा आरोप करण्याआधी ट्वीटरवर भाजप आणि ड्रग्ज पेडलर यांच्या संबंधावर चर्चा करूयात, असे म्हटले होते.
तसेच वक्फ बोर्डाच्या जमीन प्रकरणातील तक्रारदार मुश्ताक अहमद शेख यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. आपण ३ नोव्हेंबरला इडीकडे तक्रार दिली होती. वक्फ बोर्डाच्या मालकीची ही चार हेक्टर जागा एका ट्रस्टची असल्याचे दाखवण्यात आले आणि या ट्रस्टकडून ही जागा शासनाने पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत अधिग्रहित केली. अधिग्रहित केल्यानंतर ही जागा शासनाच्या मालकीची झाली आणि त्यापोटी शासनाने नऊ कोटी साठ लाख रुपये त्या ट्रस्टला दिले.
त्यासाठी वक्फ बोर्डाच्या सीईओंनी एनओसी दिली होती. त्यामुळे यामध्ये मोठे लोक सहभागी असू शकतात. मी यामध्ये नवाब मलिकांचे नाव घेत नाही पण यामध्ये मोठे लोक असू शकतात. हिंजवडी आयटी पार्क जवळ असलेली ही चार हेक्टर जागा आहे. ईडी ने इतक्या तत्परतेने केलेल्या कारवाईबाबत मी समाधानी असल्याचे म्हटले आहे.