सोलापूर : शहरात चोरीचे प्रमाण वाढले असून त्यात दुचाकी व मोबाईल चोरी सर्वाधिक आहे. तरीही, कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर चोरटे घरातील हाती लागेल त्या वस्तूवर डल्ला मारत असल्याचे चित्र आहे. चोरी कमी व्हावी, गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून आता रात्रीची गस्त वाढवून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.
गुन्हेगारी रोखता यावी म्हणून शहरात सीसीटीव्हीचे जाळे वाढविण्याची गरज गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सोलापुरात आल्यावर व्यक्त केली होती. पण दीड वर्षांपूर्वी पोलिस आयुक्तालयाने महापालिकेला २५० सीसीटीव्हीचा प्रस्ताव दिला आहे. त्यावर अजूनपर्यंत काहीच कार्यवाही झालेली नाही. यावर कार्यवाही होण्याची गरज आहे.
शहराचा विस्तार, लोकसंख्येत वाढ झाल्याने दरवर्षी गुन्हेगारीत नऊ टक्क्यांची वाढ होत आहे. शहरातील विजापूर नाका, एमआयडीसी व फौजदार चावडी पोलिस ठाण्याअंतर्गत गुन्हेगारीचे प्रमाण सर्वाधिक आहे.
शहरात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, यादृष्टीने अधिकारी, कर्मचाऱ्यांना निर्देश दिले आहेत. गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले असून त्यात हलगर्जीपणा चालणार नाही, अशी ताकीदही देण्यात आली असल्याचे हरीश बैजल (पोलिस आयुक्त, सोलापूर शहर) यांनी सांगितले आहे.
गुन्हेगारी रोखता यावी म्हणून शहरात सीसीटीव्हीचे जाळे वाढविण्याची गरज गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केली. मात्र, दीड वर्षांपूर्वी पोलिस आयुक्तालयाने महापालिकेला २५० सीसीटीव्हीचा प्रस्ताव देऊनही त्यावर अजूनपर्यंत काहीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे अनेक गुन्ह्यातील गुन्हेगार मोकाट असल्याचे चित्र आहे. नोकरी, शिक्षण अथवा अन्य कामांसाठी परगावी गेलेल्यांच्या घरावर चोरट्यांनी वॉच ठेवून चोरी करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे नागरिकांना घरात मौल्यवान वस्तू अथवा मोठी रक्कम ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
घरासमोर दर्जेदार सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याच्याही सूचना केल्या. परंतु, त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. दुसरीकडे चेन स्नॅचिंगचे गुन्हेही वाढत असून अनेकदा सार्वजनिक रस्त्यावरून जाणाऱ्या गुन्हेगारांना शोधताना पोलिसांना कठीण जाते. या पार्श्वभूमीवर मुख्य चौकांसह वर्दळीच्या ठिकाणी अडीचशे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असा प्रस्ताव पोलिस आयुक्तालयाने महापालिकेला दीड वर्षांपूर्वी दिला. स्मार्ट सिटीतून पाच कोटींचे कॅमेरे बसविले जातील, असे आश्वासन पोलिसांना मिळाले. मात्र, दीड वर्षांनंतरही शहरात कुठेही स्मार्ट सिटीकडून सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आलेला नाही.
शहरातील सात पोलिस ठाण्यांपैकी जेलरोड, एमआयडीसी, फौजदार चावडी, विजापूर नाका, जोडभावी पेठ आणि सदर बझार या पोलिस ठाण्यांकडे गुन्हेगारांच्या शोधासाठी डीबी पथक कार्यरत आहेत. मात्र, मनुष्यबळाअभावी सलगर वस्ती पोलिस ठाण्याकडे अद्याप डीबी पथक निर्माण झालेले नाही.
दुसरीकडे काही पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी रजा, सुट्ट्यांवर गेल्यानंतर अतिरिक्त मनुष्यबळाअभावी संबंधित कर्मचारी सुट्टीवरुन येईपर्यंत गुन्ह्यांचा तपास जागेवरच थांबलेला असतो, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर अन्यायग्रस्तांना वेळेत न्याय मिळावा म्हणून नूतन पोलिस आयुक्त हरीश बैजल काय ठोस उपाययोजना करतील, याचीही नागरिक आतूरतेने वाट पाहत आहेत.
* सोलापुरात सराफ बाजारातील ज्वेलर्सचे दुकान फोडले
सोलापूर : पूर्व मंगळवार पेठ सराफ बाजार येथे असलेल्या मांगल्य ज्वेलर्स या दुकानाचे लोखंडी शटरला लावलेले कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील आठ लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने चोरून नेले.
या घटनेची हकीकत अशी की, रामकृष्ण महादेव रेवणकर यांचे सराफ बाजारात ज्वेलरचे दुकान आहे. आदल्या दिवशी ते दुकान बंद करून घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या दुकानाच्या लोखंडी शटरला लावलेले कुलूप अज्ञात चोरट्याने तोडून दागिने चोरून नेल्याचे लक्षात आले. या चोरीत अज्ञात चोरट्यांनी चांदीचे लहान मोठे तांबे, फुलपात्र , समई, वाट्या, पैजन, जोडवे, लेडीज अंगठ्या, चांदीचे वाळे, बिंदी, वाळा, मेकला असं जवळपास ८ लाख रुपये किमतीचे दागिने. तसेच पाच हजार रुपये किमतीचे सीसीटीव्ही कॅमेरेचे डी व्ही आर चोरून नेले. अज्ञात चोरट्याच्या विरोधात जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मांजरे हे करीत आहेत.
* राहुल नगरात विवाहित इसमाची
गळफास घेऊन आत्महत्या
सोलापूर – मजरेवाडी येथील राहुल नगरात राहणाऱ्या मनोज नागनाथ नवगिरे (वय ३४) या विवाहित इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली . ही घटना आज शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली .
घरातील छताच्या पंख्याला साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह दुपारी आढळून आला. त्याची पत्नी दोन वर्षापूर्वी माहेरी गेली होती. तेव्हापासून तो मनोरुग्णा सारखा वागत होता. अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीसात झाली. फौजदार गायकवाड पुढील तपास करीत आहेत.