मुंबई : मुंबईतील वांद्रे रेल्वे पोलिसांना निनावी फोनद्वारे मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर खबरदारी म्हणून सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, हा फोन करणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधला असता बॉम्बस्फोट घडवण्याचा कट ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. फोन करणारी संबंधित व्यक्ती दुबई येथील रहिवासी आहे. तसेच या व्यक्तीची मानसिक स्थिती चांगली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबईतील वांद्रे रेल्वे पोलिसांना निनावी फोनद्वारे मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली आहे. तशी माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली आहे. हा फोन आल्यानंतर मुंबईतील सर्वच रेल्वे स्थानकांत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
काल शनिवारी दुपारी दुबईहून वांद्रे रेल्वे पोलिसांच्या दूरध्वनी क्रमांकावर कॉल केला हा फोन कॉल आला होता, त्याला परत फोन लावल्यावर माझ्याकडे असलेली माहिती तुम्हाला दिली आहे. आता मला डिस्टर्ब करु नका, असं तो व्यक्ती म्हणाला. त्यानंतर त्याने आपला फोन बंद करुन ठेवला आहे. त्यामुळे त्या व्यक्तीचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. शेवटी पोलीस तपासात हा फेक कॉल असल्याचं स्पष्ट झालं.
सर्वच पोलिसांना सतर्कचा इशारा देताना परिसरात जास्तीत जास्त कोम्बिंग ऑपरेशन करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहे. हितेश नावाचा एक व्यक्ती कांदिवली परिसरात राहत असून सध्या तो नोकरीनिमित्त दुबई येथे वास्तव्यास आहे. त्याने स्वत:ची ओळख सांगून तसेच त्याची सविस्तर माहिती दिली.
त्यानंतर त्याने जावेद नावाचा एक व्यक्ती मुंबईत बॉम्बस्फोट घडविणार आहे. आगामी दिवसांत कधीही मुंबईत बॉम्बस्फोट होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी योग्य ती काळजी घ्यावी, तसेच त्याचे नाव गुपित ठेवावे अशी विनंती केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या माहितीनंतर वांद्रे रेल्वे पोलिसांनी ही माहिती मुंबई पोलिसाच्या मुख्य नियंत्रण कक्षासह रेल्वे नियंत्रण कक्षाला दिली होती. या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत सर्वच पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. परिसरात जास्तीत जास्त कोम्बिंग ऑपरेशन आणि नाकाबंदी करा. संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करा. एटीएसलाही सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले असून शहरात अशा प्रकारे घातपात होणार आहे का याची काही सूचना गुप्तचर विभागाकडून प्राप्त झाली आहे याची शहानिशा सुरु आहे.
या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे तर मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानकाची श्वान पथकाच्या मदतीने शनिवारी कसून तपासणी करण्यात आली होती.
दरम्यान, नवरात्रोत्सवाच्या पहिल्यात दिवशी अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला होता. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. माहिती मिळताच कोल्हापूर पोलिसांसह बॉम्बशोधक पथक मंदिरात दाखल झाले. त्यांच्याकडून मंदिराचा कानाकोपऱ्यात शोध घेण्यात आला.