नवी दिल्ली : तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ७३ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने सामना जिंकला. तसेच मालिकाही जिंकली. राहुल द्रविड याच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या व रोहित शर्माच्या फुल टाईम नेतृत्वाखालील हा विजय मिळवला आहे.
भारताने न्यूझीलंडसमोर १८५ धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ १११ धावांत गारद झाला. भारताने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडचा ३-० ने पराभव करत व्हॉईटवॉश दिला. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने ही दमदार कामगिरी केली.
भारतीय संघाने तिसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ७३ धावांनी पराभव केला आहे. या सामना विजयासह भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धची मालिका ३-० ने जिंकली आहे. याआधी भारतीय संघाने मालिकेतील दोन्ही सामने जिंकले होते.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करतांना भारताने ७ गड्यांच्या मोबदल्यात १८४ धावा केल्या होत्या. रोहितने ५६ धावांची शानदार खेळी केली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ १११ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
भारतीय संघाचा नवखा कर्णधार रोहित शर्मा या टी२० मालिकेत मालिकावीर ठरला आहे. यासह रोहितने एका विक्रमात टी२० संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची बरोबरी केली आहे. रोहित शर्माने या मालिकेत सलग दोन अर्धशतकी खेळी केल्या आहेत. पहिल्या सामन्यात देखील त्याने ४८ धावांची खेळी खेळली होती. म्हणून त्याला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
— Cricsphere (@Cricsphere) November 21, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
टी-२० संघाचा कर्णधार म्हणून मालिकावीर पुरस्काराने सन्मानित होताच त्याने विराट कोहली आणि सुरेश रैना यांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. दोघांनी भारतीय टी-२० संघाचे कर्णधार असताना मालिकावीर पुरस्कार पटकावला होता.
दरम्यान भारतीय संघाने या सामन्यात २० षटकांत ७ बाद १८४ धावा केल्या. भारताकडून रोहित शर्माने ३१ चेंडूत ५६ धावा आणि इशान किशनने २१ चेंडूत २९ धावा केल्या. श्रेयस अय्यरने २५ आणि व्यंकटेश अय्यरने २० धावा केल्या. हर्षल पटेलनेही ११ चेंडूत १८ धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनरने २७ धावांत ३ बळी घेतले होते. ईश सोढी, ऍडम मिलने, लोकी फर्ग्युसन आणि ट्रेंट बोल्ट यांना १-१ यश मिळाले होते.
प्रत्युत्तरात न्यूझीलंडकडून मार्टिन गप्टिलने अर्धशतक झळकावत संघाला सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. त्याने ३६ चेंडूत ५१ धावा केल्या. यादरम्यान त्याने ४ चौकार आणि ४ षटकार मारले. मात्र संघातील अन्य कोणताही खेळाडू खेळपट्टीवर टिकाव धरू शकला नाही.
न्यूझीलंड संघातील ८ खेळाडू दहाच्या आकड्याला स्पर्श करू शकले नाहीत. संपूर्ण संघ १७.२ षटकांत १११ धावांत गारद झाला. या डावात अक्षर पटेलने ३ तर हर्षल पटेलने २ बळी घेतले. न्यूझीलंडवर भारताचा हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. तत्पूर्वी, न्यूझीलंडवर भारताचा सर्वात मोठा विजय ५३ धावांचा होता.