सोलापूर : पतीवरील चारित्र्याच्या संशायवरून राहत्या घरामध्ये डोक्यात दगडी पाटा घालून पत्नीने पतीचा खून केल्याची घटना करमाळा तालुक्यातील खडकी येथे घडली आहे. यात दीरानेच भावजय विरोधात फिर्याद दिली.
सुदाम श्यामराव गायकवाड (वय 52, रा. खडकी, ता. करमाळा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. संशयित आरोपी पत्नी सुनीता सुदाम गायकवाड हिला पोलिसांनी अटक केली आहे.
सुदामाला रुग्णवाहिकेतून करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेव्हा डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. त्यानंतर सुदामच्या पत्नीला विचारले तेव्हा ‘मीच दगडी पाटा तोंडावर मारून त्यास जीवे ठार मारले आहे’ असे सांगितले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तिने असे का केले, याबाबत विचारले तेव्हा ती गप्प राहिली, असेही फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना रविवारी (दि. २१) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. यात पतीचा मृत्यू झाला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. सुदाम शामराव गायकवाड (वय ५२, रा. खडकी, ता. करमाळा) असे मृताचे नाव आहे. सुनिता सुदाम गायकवाड असे संशयित आरोपीचे नाव आहे. याची फिर्यादी दीर रावसाहेब शामराव गायकवाड (४२, रा खडकी) यांनी करमाळा पोलिसात दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पत्नी सुनीता सुदाम गायकवाड हिच्या विरुद्ध कलम ३०२ प्रमाणे करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सुदाम गायकवाड याचा भाऊ रावसाहेब श्यामराव गायकवाड (वय 42, रा. खडकी, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
सध्या मयत सुदाम हा म्हैसगाव कारखान्यासाठी बोरगाव (ता. करमाळा) येथे ऊसतोडणी करत होता. तो काही कामानिमित्त खडकी या गावात दोन दिवसापूर्वीच आला होता. तर मुलेही ऊस तोडणीसाठी बाहेर गावी गेलेले होते. तिने या खुनाबाबत आपल्या मुलांना फोन करून पतीला ठार मारल्याचे सांगितले. थोड्या वेळाने स्वत:हून ती पोलिस ठाण्यात हजर झाल्याचे वृत्त आहे.
आरोपी सुनिता गायकवाड हिला करमाळा न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. या खूनाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ हे करत आहेत.
फिर्यादीत म्हटले आहे की, सुदामची पत्नी नेहमी त्याच्यावर संशय घ्यायची. त्यामुळे दोघांमध्ये भांडणे व्हायची. रविवारी (ता. 21) सकाळी आठ वाजता मोठ्या भावाच्या घरी काही तरी झाल्याचे समजले. त्यानंतर आम्ही सुदामच्या घरी गेलो. तेव्हा सुदाम रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याच्या तोंडावर गंभीर दुखापत झालेली होती. घरा समोरील बाजूचा आतमधून दरवाजा बंद तर मागील दरवाजास बाहेरून कुलूप होते.